ऑनलाइन लोकमत रियाध, दि. 5 - सौदी अरेबियाच्या दौ-यावर असलेल्या ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी सौदीची प्रथा मोडून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. सौदीमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाताना डोक्यापासून पायाच्या अंगठयापर्यंतचा भाग वस्त्रामध्ये झाकून ठेवावा लागतो. सौदीमध्ये महिलांसाठी अत्यंत कठोर नियम आहेत. तिथे मुस्लिम महिला हिजाबमध्ये डोके आणि केस झाकून ठेवतात. थेरेसा मे यांनी सौदीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मानण्यास नकार देताना आपले केस वस्त्रामध्ये झाकून घेण्यास नकार दिला. सौदीमध्ये डोक्यावरचे केस झाकण्यास नकार देणा-या मे पहिल्या महिला नाहीत यापूर्वी अनेक पाश्चात्य महिला नेत्यांनी ही प्रथा मानण्यास नकार दिला आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर नव्याने व्यापारी करार करण्यासाठी थेरेसा मे सध्या आखाती देशाच्या दौ-यावर आहेत. मिशेल ओबामा 2015 सौदीचे राजे किंग अब्दुल्लाह यांच्या निधनानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाम यांच्यासोबत माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा सौदीच्या राजपरिवाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मिशेल यांनी सौदीचे राजे अब्दुल अझीझ अल सौद यांच्याबरोबर केलेल्या हस्तांदोलनावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. मिशेल यांनी यावेळी आपले डोके आणि केस झाकले नव्हते. हिलरी क्लिंटन 2012 अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री म्हणून हिलरी क्लिंटन सौदीच्या दौ-यावर गेल्या त्यावेळी त्यांनी आपले डोके आणि केस वस्त्रामध्ये झाकले नव्हते. लॉरा बुश 2007 सौदी अरेबियातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी लॉरा बुश यांनी 2007 मध्ये सौदीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सुद्धा डोके आणि केस झाकणारा हिजाब घेतला नव्हता.अँजला मर्केल 2010 जर्मनीच्या चांसलर अँजला मर्केल यांनी 2010 मध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला. त्यावेळी जर्मनी-सौदी आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये सहभागी होताना त्यांनी डोक्यावरचे केस झाकणार हिजाब घातला नव्हता.