शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीननं पुन्हा एकदा दिली तैवानवर हल्ल्याची धमकी; म्हणे,अमेरिकेनं लष्कर पाठवू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 3:53 PM

1 / 12
चीननं पुन्हा एकदा तैवानला धमकी दिली आहे. अमेरिकेकडून तैवानशी झालेल्या पॅट्रियॉट मिसाइलच्या करारावरून चीन चांगलाच संतापला आहे.
2 / 12
अमेरिकेनं लष्करानं तैवानसोबत युद्धाभ्यासासाठी पाठवणं म्हणजे चीननं आव्हान देण्यासारखं आहे, असं चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल रेन गुओकियांग यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे तैवानवर सैन्य कारवाईशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही रेन गुओकियांग यांनी स्पष्ट केलं आहे.
3 / 12
अमेरिकेच्या या निर्णयानं दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच तैवानमधली शांतताही भंग पावेल, असा इशाराच चीननं अमेरिकेला दिला आहे.
4 / 12
चिनी कर्नल म्हणाले की, दक्षिण चिनी समुद्र, उईगर मुस्लिम आणि दूतावास बंद करण्याबाबत उभय देशांमधील वाद आधीच विकोपाला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत तैवानमध्ये अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो.
5 / 12
अमेरिकन सरकारला तातडीने आपली चूक मान्य करून तैवानशी कोणत्याही प्रकारचा अधिकृत आणि लष्करी संपर्क रोखण्यास चीन बजावत आहे.
6 / 12
अमेरिकेला वन चायना धोरणाचे अनुसरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. चीन एक चीन धोरणात तैवान आणि हाँगकाँगला आपला प्रदेश समजतो. तर अमेरिकेने तैवानच्या स्वातंत्र्यास अनुकूलता दर्शविली आहे.
7 / 12
तैवानचे स्वातंत्र्य रोखण्यासाठी आपल्यात दृढ इच्छाशक्ती, पूर्ण आत्मविश्वास आणि पुरेशी क्षमता आहे, असा इशारा चिनी कर्नलने दिला. आम्ही राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे पूर्णपणे संरक्षण करू. यासाठी आम्ही तैवानवर सैन्य कारवाई करण्यापासून मागे हटणार नाही.
8 / 12
1949मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात कम्युनिस्ट पक्षाने चियांग काई शेक यांच्या नेतृत्वातील कॉमिंगटाँग सरकार उलथून टाकले होते. त्यानंतर चियांग काई-शेक यांनी तैवान बेटावर जाऊन आपले सरकार स्थापन केले. कम्युनिस्ट पक्षाकडे त्यावेळी मजबूत नेव्ही नव्हती. म्हणून त्यांनी समुद्र पार करून बेटाचा ताबा घेतला नाही. तेव्हापासून तैवान स्वत: ला चीनचे प्रजासत्ताक मानत आहे.
9 / 12
चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. चिनी कम्युनिस्ट पक्षानेही यासाठी सैन्य वापरावर जोर दिला आहे. तैवानचीही स्वतःची सेना आहे. ज्याला अमेरिकेचा पाठिंबादेखील आहे. तैवानमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आल्यापासून चीनशी असलेले संबंध बिघडू लागले आहेत.
10 / 12
अमेरिकेची पॅट्रियॉट प्रगत क्षमता - 3 (PAC-3) मिसाइल ही जगातील सर्वोत्तम संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. ही क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्वरित शत्रूची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि लढाऊ जहाज नष्ट करण्यास सक्षम आहे. सर्वच मोसमात क्षेपणास्त्र डागण्यात तरबेज असलेली ही संरक्षण प्रणाली लॉकहीड मार्टिन यांनी तयार केली आहे.
11 / 12
पॅट्रियॉट प्रगत क्षमता - 3 ही संरक्षण प्रणाली अमेरिका, जर्मनी, ग्रीस, इस्राएल, जपान, कुवैत, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, कोरिया, पोलंड, स्वीडन, कतार, संयुक्त अरब अमिराती, रोमानिया, स्पेन आणि तैवान येथे सध्या कार्यरत आहेत.
12 / 12
2003च्या इराक युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या सैन्याने पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली होती. कुवेतमध्ये तैनात केलेल्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने शत्रूची अनेक क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली.