china and climate change is cause of pakistan flood
Pakistan Flood: चीननं पाकिस्तानचं दिवाळं काढलं अन् उर्वरित काम महापूरानं केलं...!, समजून घ्या 'ड्रॅगन'नीती... By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 8:08 AM1 / 9पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा, गिलगिट-बाल्टिस्तान, पंजाब, बलूचिस्तान, सिंध आणि पाकव्याप्त काश्मीरमधील प्रकल्पांना चीन व पाकिस्ताननं चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर (सीपीईसी) असं नाव दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा ही तिनही ठिकाणं उंचीवर आहेत. इथं सर्वाधिक उंची ८४६९ मीटर म्हणजे जवळपास २७,७८५ फूट इतकी आहे. चीनकडून गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर-पख्तूनख्वा येथे रस्ते निर्मितीचं काम केलं जात आहे. गिलगटच्या खुंजरेबमध्ये रेल्वे लाइनचं काम सुरू आहे. एकूण मिळून पाच रेल्वे लाइन प्रोजेक्टवर वेगानं काम सुरू आहे. याशिवाय अनेक पाटबंधारे, धरणं देखील चीनकडून बांधण्यात येत आहेत. यातील काही पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पख्तूनख्वा प्रांतात आहेत. 2 / 9पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापनानं जे आकडे दिले आहेत ते भयंकर आहेत. पाकिस्तानमधील महापुरात आतापर्यंत १३५० जणांचा बळी गेली आहे. तर ५ कोटी लोकांचं स्थलांतर झालं आहे. ९० लाख प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. १० लाख घरं वाहून गेली आहेत. ४० हून अधिक जलस्त्रोत, ओढे, नाले, नद्या महापुरानं ओसंडून वाहत आहेत. २२० हून अधिक पूल नदीत वाहून गेले आहेत. ९० टक्के शेतजमिनीची वाट लागली आहे. देशाचा जवळपास एकतृतियांश हिस्सा पाण्याखाली आहे. या महापुरामुळे जवळपास ८० हजार कोटींचं नुकसान पाकिस्तानला झालं आहे. या महासंकटाला जबाबदार कोण?3 / 9हायड्रोपावर प्रोजेक्ट आणि वीज उत्पादन करणारे युनिट्स बहुतांश करुन कोळशावर चालतात. त्यामुळे होणाऱ्या प्रचंड प्रदुषणामुळे पर्वतरांगांमधील वातावरणाची मोठी हानी होत आहे. तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे पर्वतरांगांचं नुकसान होत आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान आणि पख्तूनख्वा हे पूर्णपणे पर्वतरांगांनी वेढलेले प्रदेश आहेत. काराकोरम रेंज देखील याच ठिकाणी आहे. या रेंजसह पाकिस्तानच्या उंचीवरच्या ठिकाणी ७२०० हून अधिक ग्लेशिअर्स आहेत. चीनकडून सुरू असलेल्या विकास कामांमुळे तापमानात सातत्यानं वाढ होत आहे आणि ग्लेशिअर्स वितळू लागले आहेत. त्यामुळे मान्सूनमध्ये पाकिस्तानला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. 4 / 9पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुरात आतापर्यंत १३५० हून अधिक जणांचा जीव गेला आहे. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंग्सच्या क्लायमेट अँड रिसिलिएन्समधील असोसिएट प्रोफेसर डॉ. लिज स्टीफेन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये आलेला महापुराची शक्यता दशकात एकदाच असते. हे आजवरची सर्वोच्च पातळी आहे. पाकिस्तानमधील महापुरात मृत्यूंची दोन कारणं आहेत. एक म्हणजे देशाच्या उंचावरील ठिकाणी नदीच्या किनाऱ्यांवर झालेलं निकृष्ट दर्जाचं काम. जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढतो तेव्हा नदी किनाऱ्यावर वसलेल्या वस्ती, घरं, रस्ते, रेल्वे लाइन इत्यादी सर्वांचं नुकसान होतं. पाकिस्तानमध्ये चीनकडूनच सर्वाधिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचं कार्य सुरू आहे. 5 / 9पाकिस्तानमध्ये आलेल्या अशा महापुराचा अंदाज व्यक्त करणं जगातील कोणत्याच वैज्ञानिक संस्थेला शक्य नाही, असंही प्रोफेसर लिज म्हणाल्या. अशापद्धतीच्या महाभयंकर महापुराची पूर्वकल्पना मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या मानवीवस्तीला वाचवणं खूपच अडचणीचं आहे. चीननं आपल्या प्रदेशात २२ हजाराहून अधिक धरणांचं बांधकाम केलं आहे. तरीही चीनमध्ये दरवर्षी महापूर येतो. चीन जर स्वत:च्या देशाला महापुरापासून वाचवू शकत नाही. तर तो पाकिस्तानला तरी कशी मदत करणार हा प्रश्नच आहे. 6 / 9पाकिस्तानमधील उंचावरील ठिकाणी जंगलांची संख्या खूप कमी आहे. कोरड्या पर्वतरांगा आहेत. त्यात चीन विकासकामं वेगानं करत आहे. तळाच्या ठिकाणी जिथं जंगल, वनस्पती, झाडं आहेत. त्याठिकाणीही विकासकामं सुरू आहेत. वेगानं येणाऱ्या पाण्याचा प्रवाह संथ करण्याचं काम जंगल आणि झाडं करत असतात. पण रेल्वेलाइन आणि रस्त्यांसाठी जंगलं तोडण्याचं काम केलं गेलं तर पाकिस्तानला नैसर्गिक आपत्तीपासून कुणीच वाचवू शकत नाही. 7 / 9पाकिस्तान चीनला आपला जवळचा मित्र मानतो. पाकिस्तानात काम करणाऱ्या चीनी कंपन्या सीपीईसी प्रोजेक्टमधून कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण स्थानिक पातळीवर कोणतंही मजबूत आणि गुणवत्ता पूर्ण काम होताना दिसत नाही. चीनी कंपन्यांमुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली असल्याचा एक लेख पाकिस्तानच्या इस्लाम खबर नावाच्या माध्यम समूहानं प्रसिद्ध केला होता. चीनच्या दोन डझन कंपन्या आणि इतर स्वतंत्र पावर प्रोजेक्ट वीज उत्पादन ठप्प करण्याची वेळोवेळी धमकी देत असतात. थकबाकी चुकवा नाहीतर वीज संकटाला सामोरं जा असं चीनकडून बजावण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानला ३ हजार कोटी पाकिस्तानी रुपये चीनला द्यावे लागले होते. 8 / 9ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत पाकिस्तान जगातील आठवा सर्वाधिक धोकादायक देश आहे. म्हणजेच जर एखादी नैसर्गिक आपत्ती देशात निर्माण झाली तर त्याच्या भयंकर परिणामांना देशातील सर्वाधिक जनतेला सामोरं जावं लागेल. पाकिस्तानमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढतं. तर मान्सूनही मोठी आपत्ती ठरू लागला आहे. यामुळे पाकिस्तानचा आर्थिक कणाच कोसळतो आणि खूप मोठं नुकसान देशाला सोसावं लागत आहे.9 / 9सीपीइसी अंतर्गत ३० हून अधिक चीनी कंपन्या सध्या पाकिस्तानमध्ये काम करत आहेत. या कंपन्यांकडून पाकिस्तानमध्ये वेगवेगळी विकास कामं केली जात आहेत. यात रेल्वे लाइन, रस्ते, महामार्ग, ऊर्जा इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. चीननं पाकिस्तानच्या अगदी दक्षिणेपर्यंत आपले हातपाय पसरले आहेत. सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तानातील व्यवसाय वाढविण्याचा चीनचा मास्टर प्लान आहे. भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनला पाकिस्तानला आपलं गुलाम बनवायचं आहे हे काही लपून राहिलेलं नाही. चीनला यात बऱ्यापैकी यश देखील आलेलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications