China catch that opportunity and became a superpower challenging the USA
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:59 PM1 / 21दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगात दोन महासत्ता उदयास आल्या होत्या. पहिली अमेरिका आणि दुसरी सोव्हिएत युनियन. मात्र नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. या काळात अमेरिकेला कुठला देश आव्हान देईल, असे वाटत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत चीनने आपली आर्थिक आणि लष्करी ताकद वाढवून अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. 2 / 21चीनने २००८ मध्ये केलेले बीजिंग अॉलिम्पिकचे आयोजन संपूर्ण जगाचे डोळे दिपवणारे ठरले होते. २००८ मध्ये जगावर मंदीचे सावट असताना चीनने मात्र अॉलिम्पिकचे भव्य पद्धतीने आयोजन केले. त्यामुळे चीनने अर्थसत्ता म्हणून किती मोठी मजल मारली आहे याचा जगाला प्रत्यय आला.3 / 21२००८ साली आलेल्या मंदीनंतर जागतिक अर्थविश्वात फार मोठे फेरबदल झाले. त्यावेळी चीन आणि भारताकडून जागतिक अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याची अपेक्षा करण्यात येत होती. चीनने ही संधी अचूकपणे साधली. चीनचा आर्थिक विकास आणि सरकारी बँकांनी मंदी सावरून नेली. 4 / 21लोकशाहीचा तिटकारा असलेल्या चीनने सुरुवातीच्या काही दशकांमध्ये आपल्याकडील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. त्यातून चीनने स्वतःला उत्पादन केंद्र म्हणून पुढे आणले. तसेच चीनी उत्पादने जगातील इतर उत्पादनांना आव्हान देऊ लागली. 5 / 21वाढत्या भांडवलशाहीनंतर जगातील विकसित देशांमध्ये श्रीमंत आणि गरीब अशी दरी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मात्र चीनने आपल्या मध्यम वर्गाला बळ दिले. श्रीमंत होत असलेल्या या वर्गाने चीनला अशा बाजारात परिवर्तीत केले ज्याची गरज प्रत्येक देशाला भासू लागली. 6 / 21चीनच्या आर्थिक विकासाचा फायदा उचलण्यासाठी सर्व आघाडीच्या देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली. अमेरिका, जर्मनी, अॉस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ब्रिटनसह सर्वच विकसित देशांना चीनमधील बाजार खुणावू लागला. तर चीननेही आपला राजकीय आणि आर्थिक प्रभाव विश्वव्यापी बनवण्यासाठी ही संधी साधून घेतली. 7 / 21मानवाधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या गळचेपीसाठी पाश्चात्य देश दीर्घकाळ चीनवर टीका करत होते. मात्र चीनमधील बाजारांमध्ये असलेली गुंतवणूक, चीनमधून असणारी मागणी आणि चीनी सरकारच्या दबावाखाली हा विरोध गुंडाळण्यात आला. 8 / 21आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या चीनपासून जगाला फारशी समस्या नव्हती. मात्र २०१३ साली शी जिनपिंग राष्ट्रपती बनल्यानंतर हे चित्र बदलले. जिनपिंग यांनी चीनी स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले. 9 / 21आर्थिक विकासामुळे मजबूत झालेले चीनी लष्कर आतापर्यंत आपल्या सीमेबाहेरील वादविवादांपासून लांब राहत होते. मात्र जिनपिंग राष्ट्रपती बनल्यानंतर चीनी सैन्याने आजूबाजूच्या भागात दादागिरी सुरू केली. याची सुरुवात दक्षिण चीनी समुद्रापासून झाली. 10 / 21एकीकडे शी जिनपिंग आणि दुसरीकडे बराक ओबामा यांच्या काळात अमेरिका आणि चीनमधील विवाद उघडपणे समोर आले नाहीत. दक्षिण चीन समुद्रातील सैनिकी तळावरून अमेरिका आणि चीन एकमेकांना इशारे देत राहिले. मात्र व्यापारी संबंधांमुळे हा वाद अधिक वाढला नाही.11 / 21अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्ध आणि आर्थिक मंदी यामुळे अमेरिका आर्थिक दृष्टीने कमकुवत झाली. तर चीनवर वाढलेल्या अवलंबित्वाने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाच्या पायात बेड्या घालण्याचे काम केले. त्यामुळेच चीनच्या वाढत्या आक्रमक भूमिकेसमोर अमेरिका अनेकदा माघार घेताना दिसली. 12 / 21एकीकडे चीन दक्षिण चीनी समुद्रात आपले वर्चस्व वाढवत असताना दुसरीकडे रशिया आणि युरोपियन युनियन यांच्या वारंवार मतभेद होत होते. २०१४ मध्ये रशियाने क्रीमियाचे आपल्या देशात विलीनीकरण करून घेतले. त्यावरून अमेरिका आणि युरोपियन देश रशियाविरोधात आक्रमक झाले. मात्र या काळात चीनने गुपचूपपणे आफ्रिकेत आपली पाळेमुळे रोवली. 13 / 21२०१२ नंतर अरब राष्ट्रांमध्ये इस्लामिक स्टेटच उदय झाला. त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या राजकीय आणि मानवी संघर्षात पाश्चात्य राष्ट्रे गुंतली. 14 / 21२०१६ मध्ये चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. ज्या गरीब देशांना जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कडक नियमानुसार कर्ज घ्यावे लागे, अशा राष्ट्रांना आपल्याकडे आकर्षित केले. चीनने त्या देशांना लीजचा मोबदला म्हणून अब्जावधी डॉलर आणि आपले तज्ज्ञ दिले. 15 / 21वन बेल्ट वन रोडच्या मदतीने आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया आणि आखाती देशांपर्यंत पोहोचण्याचा चीनचा मानस आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानमधील ग्वादर बंदरापर्यंत तसेच आफ्रिकेत हिंदी आणि अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचेल. 16 / 21२०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी अमेरिका फर्स्ट ची घोषणा दिली. त्यांनी चीनबाबतचे चालढकल करणारे धोरण बदलून चीनला थेट टक्कर देण्याचे धोरण अवलंबले. तसेच या काळात अमेरिकेचे चीनसोबत व्यापारी युद्ध सुरू झाले.17 / 21चीनचा ज्या ज्या देशांसोबत वा स्वायत्त प्रदेशांशी विवाद आहे त्या भागापर्यंत वेगवान लष्करी हालचाली करण्याचा आराखडा चीनने तयार केला आहे. व्हिएतनाम, तैवान, जपान आदी देशांवर दबाव आणण्यासाठी चीनने दक्षिण चीन समुद्राचा वापर केलाय. तर भारताला दबावाखाली ठेवण्यासाठी पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेत हालचाली वाढवल्या आहेत. 18 / 21चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेला युरोपियन मित्रांकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र येथून अमेरिकेच्या हाती निराशा लागली. 19 / 21 सध्या अमेरिकेकडे चीनविरोधात उभे राहण्यासाठी भारत, ब्रिटन, जपान अॉस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम हे मित्र आहेत. आता या राष्ट्रांवरून अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. 20 / 21चीनमधील वुहान शहरामधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी घडवली आहे. आता यासाठीच्या जबाबदारीवरून विवाद सुरू आहे. हा विवाद लवकर थांबण्याची शक्यता नाही. 21 / 21दरम्यान, कोरोनामधून धडा घेतलेले देश आता चीनवरील अवलंबित्व हळूहळू कमी करण्याची सुरुवात करत आहेत. चीनला त्याच्या अर्थव्यवस्थेमधूनच ताकद मिळत आहे याची जाणीव अमेरिकेसह सर्वच देशांना झाली आहे. तसेच याचे काय परिणाम होऊ शकतात हे कोरोनामुळे दिसून आले आहे. त्यामुळे निर्मितीबाबत इतर देशांवर असलेले अवलंबित्व कमी करण्याची तयारी अनेक देशांनी सुरू केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications