शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 6:32 PM

1 / 12
कोरोना संक्रमणापासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठा सर्वच देशांत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्रा, लशींचे उत्पादन कमी प्रमाणात होत असल्याने देशांकडे फारसा पर्याय नाही. यामुळेच बरेचसे देश चीनच्या सिनोफॉर्म लशीच्या भरवशावर महामारीवर नियंत्रण मिलविण्याचे स्वप्न पाहत आहेत. (China Corona Vaccines user countries paying price battling with corona outbreaks what will pakistan and nepal)
2 / 12
चिनी लशीचा वापर करणाऱ्या देशांना, आता या लशीवर भरवसा करणे चांगलेच महागात पडताना दिसत आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि नेपाळमध्येही बेधडकपणे चिनी लशीचा वापर सुरू आहे. यामुळे या देशांतही कोरोना संकट वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
3 / 12
बघत होते चिनी लशीनं कोरोनाचा खात्मा करायचे स्वप्न - द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचा शेजारी असलेल्या मंगोलियाने गर्मीच्या दिवसांपर्यंत चिनी कोरोना लशीच्या सहाय्याने कोरोनाचा खात्मा करण्याचा दावा केला होता. बहरीननेही याच लशीचा वापर करत, लवकरच सर्व जण पुन्हा सुरळीतपणे जीवन जगू लागतील, असे म्हटले होते.
4 / 12
सेशेल्स (Seychelles) तर आपली अर्थव्यवस्था पुन्हा पटरीवर आणण्यासाठी या लशीचा वापर करत होता. एवढेच नाही, तर चिलीमध्ये चिनी लस घेतल्यानंतर एवढे लोक कोरोना संक्रमित झाले आहेत, की खुद्द तज्ज्ञांनाच इशारा द्यावा लागला आहे.
5 / 12
लसीकरणानंतरही या देशांत हाहाकार - या चारही देशांनी फार सहजपणे उपलब्ध असलेल्या चिनी लशीवर विश्वास ठेवला. मात्र, आता या सर्वच देशांत कोरोना व्हायरसपासून मुक्तीऐवजी संक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6 / 12
चीनने गेल्या वर्षाच्या शेवटी व्हॅक्सीन डिप्लोमसीच्या सहाय्याने जगभरातील अनेक देशांना आपल्या झेंड्याखाली आणण्याची मोहीम सुरू केली होती. भारत आणि अमेरिका जगाला लशीचा पुरवठा करून आपल्या बाजूने वळून घेतील, अशी त्याला भीती होती.
7 / 12
नव्या व्हेरिएंटवर प्रभावी नाही चिनी लस! चिनी लस कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे अनेक देशांतून आलेल्या डेटावरून स्पष्ट झाले आहे. विशेषतः कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर या लशीचा परिणाम बिलकूलच होत नसल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कुठल्याही देशात कोरोना रुग्ण कमी होण्याचे प्रमाण, हे तो देश आपल्या नागरिकांना कोणती लस देतो यावर अवलंबून आहे.
8 / 12
गेल्या आठवड्यात कोरोना संक्रमित टॉप 10 देशांत हे सर्व डेटा ट्रॅकिंग प्रोजेक्ट अवर वर्ल्ड इन डेटा (Our World in Data)नुसार, सेशेल्स, चिली, बहरीन आणि मंगोलियात 50 ते 68 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. टक्केवारीचा विचार करता हा आकडा अमेरिकेत सर्व लोकांना टोचण्यात आलेल्या लशींपेक्षाही अधिक आहे.
9 / 12
द न्यूयॉर्क टाइम्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 10 देशांत या चारही देशांचा समावेश आहे. हे चारही देश, चीनच्या लशी सिनोफार्म आणि सिनोव्हॅक बायोटेकने तयार केलेल्या लशींचा जास्तीत जास्त वापर करत आहेत.
10 / 12
53 देशांत टोचली जातेय चिनी लस - जगभरात किमान 53 देशांत चिनी कोरोना लस टोचली जात आहे. यातील अनेक दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिणपूर्व आशियातील विकसनशील देश आहेत. चिनी कोरोना लस स्वस्त आणि साठवणूक करण्यास सोपी आहे. खरे तर, ज्या देशांकडे मायनस 20 डिग्रीपेक्षा अधिक तापमानावर लस साठविण्याची क्षमता नाही, अशा गरीब देशांसाठी ही आदर्श लस आहे.
11 / 12
लस कमी प्रभावी असल्याचे चीनने स्वत:च स्वीकारले आहे - चीनच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी, त्यांची कोरोना लस बरीच कमी प्रभावी असल्याचे स्वीकार केले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशनचे डॉयरेक्टर गाओ फू यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते, की उपलब्ध असलेल्या लशीचा प्रभाव दर अत्यंत कमी आहे. तो वाढविण्यासाठी चिनी लस निर्माता कंपन्यांसोबत बोलणे सुरू आहे.
12 / 12
प्रभावाच्या बाबतीत चिनी कोरोना लस पडली मागे - चिलीमध्ये चिनी कोरोना लस वापरली जात आहे. चीनमधील दिग्गज फार्मा कंपनी सिनोव्हॅकने ही लस तयार केली आहे. चिली विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आले होते, की चिनी लशीचा पहिला डोस केवळ 3 टक्केच प्रभावी आहे. तर दुसरा डोस घेतल्यानंतर याचा प्रभाव जवळपास 56 टक्क्यांपर्यंत बाढतो. तर ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या अध्ययनात चिनी लस केवळ 50 टक्केच प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसchinaचीनPakistanपाकिस्तानNepalनेपाळIndiaभारतAmericaअमेरिका