china coronavirus chengdu lockdown after covid outbreak corona news
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे संकट, 'चेंगदू'मध्ये लॉकडाऊन लागू, 2 कोटी लोक घरात कैद By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 8:52 AM1 / 8जगभरात कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला असला तरी आता चीनमध्ये याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोना संसर्गामुळे चीनमधील परिस्थिती बिघडू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चीन एकापाठोपाठ एक सावधगिरीची पावले उचलत आहे. 2 / 8याच पार्श्वभूमीवर चीनमधील चेंगदू या मोठ्या शहरात लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे 2 कोटींहून अधिक लोकांना आपल्या घरात कैद व्हावे लागले आहे. गुरुवारी नैऋत्य सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदू येथे कोरोना संसर्गाची 157 नवीन प्रकरणे समोर आली, त्यापैकी 51 रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. 3 / 8आपल्या कोविड धोरणांतर्गत, चीन ज्या शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, त्या शहरांना सतत लॉकडाऊन करत आहे. चेंगदूची अंदाजे लोकसंख्या जवळपास 2 कोटी 10 लाख आहे. या सर्व लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आणि त्यांच्या घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4 / 8प्रत्येक कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला अत्यावश्यक खरेदीसाठी बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत येथील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनावरील निर्बंध कधी हटवले जातील, याबाबत कोणतीही माहिती नाही. 5 / 8कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने चीनने चेंगदूमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. सिचुआन प्रांतातील चेंगदू येथील रहिवाशांना घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. तर शहरातून ये-जा करणारी 70 टक्के उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. 6 / 8 आर्थिक घडामोडींच्या दृष्टीनेही हे शहर खूप महत्त्वाचे आहे. शाळेच्या नवीन सत्राची सुरुवातही अधिकाऱ्यांनी पुढे ढकलली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक सुरूच आहे आणि नागरिकांना केवळ तातडीची गरज असतानाच शहर सोडण्याची परवानगी आहे. 7 / 8गुरुवारी जाहीर केलेल्या नियमांनुसार, 24 तासांच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील सदस्याला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अशी पावले उचलणे आवश्यक असल्याचे चीनचे म्हणणे आहे. 8 / 8चीनने शेनझेन आणि डेलियनमध्येही अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. चीनच्या वुहानमध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर हळूहळू हा कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. मात्र, आता बहुतेक देश या संसर्गातून बरे झाले आहेत आणि पुन्हा रुळावर येत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications