CoronaVirus News : भीषण, भयंकर, भयावह! शांघाईच्या रुग्णालयात गंभीर परिस्थिती; चीन पुन्हा लपवतोय मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 14:53 IST
1 / 16चीनमध्ये कोरोनाच्या नवीन लाटेमुळे परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की चीनच्या प्रशासनाने देशाची आर्थिक राजधानी शांघाईमध्ये लॉकडाईन लागू केलं आहे. 2 / 16शहरातील आर्थिक व्यवहार या काळात पूर्णपणे ठप्प झाले आहेत. परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. शांघाई शहराचे अधिकारी शहरात संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 3 / 16शांघाईमधील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असूनही, चीनचा दावा आहे की शांघाईमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही.4 / 16बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शांघाईच्या पूर्व पुडोंग भागात परिस्थिती खूपच गंभीर आहे. रिपोर्टमध्ये शांघाईच्या डोंगहाई एल्डरली केअर रुग्णालयात काम करणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर या परिस्थितीबद्दल सांगण्यात आले. 5 / 16रुग्णालयात काम करणार्या लोकांनी सांगितले की ते वृद्ध रुग्णांवर उपचार करण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्यापैकी अनेकांचा मृत्यूदेखील झाला. शांघाईच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात एका नर्सने तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता असं म्हटलं आहे.6 / 16शांघाई प्रशासनाने पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाल्यानंतर डोंगहाई एल्डरली केअर रुग्णालय सामान्य लोकांसाठी बंद केलं. तेव्हापासून शांघाई महानगरपालिकेचे रोग नियंत्रण पथक या रुग्णालयातून उर्वरित भागात संसर्ग होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. 7 / 16गेल्या आठवड्यात त्याच रुग्णालयात कामासाठी आलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की त्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पाहिलं. याशिवाय त्याच्या एका सहकाऱ्यानेही दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. असं असलं तरी या रुग्णांचा मृत्यू कोरोना किंवा इतर कोणत्या आजाराने झाला याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला.8 / 16एका नर्सने दिलेल्या माहितीनुसार, क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यापूर्वी ती या रुग्णालयात काम करायची. त्यांनी सांगितले की, नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. 9 / 16शांघाई सरकारने पाठवलेले वैद्यकीय कर्मचारी आणि तज्ज्ञांनाही संसर्ग झाल्याचा दावा त्यांनी केला. सुरुवातीला आम्ही नेहमीप्रमाणे काम करत राहिलो, पण नंतर त्यांनी प्रत्येक विभाग बंद करण्यास सुरुवात केली. तेव्हा आमच्या मॅनेजरने सांगितले की परिस्थिती खूप वाईट होत आहे. असे बरेच रुग्ण होते जे मास्क घालण्यासही नकार देत होते.10 / 16या आठवड्यात काम करणाऱ्या आणखी एका नर्सने सांगितले की, जेव्हा ती रुग्णालयात पोहोचली तेव्हा सगळीकडे घाण होती. रुग्णालयाच्या आत विखुरलेले डबे आणि कचऱ्याने भरलेल्या पिशव्या दिसत होत्या. 11 / 16चिनी सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला की, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यात अडचणी येत आहेत. आजीवर उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आजीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्याबद्दल माहिती मिळवण्यास खूप अडचणी येत आहेत.12 / 16बीबीसीने मृतांची चौकशी करण्यासाठी स्थानिक स्मशानभूमीशीही संपर्क साधला. परंतु, रुग्णालयातून रुग्णांचा एकही मृतदेह पाठवण्यात आल्या नसल्याचे सर्वांनी सांगितले. शांघाई परराष्ट्र व्यवहार कार्यालयानेही कोरोनामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूवर भाष्य केलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 16चीनमधील सर्वात मोठं शहर असलेल्या शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील काही भागांमध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे, असं शांघाईच्या स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.14 / 16चीनच्या शांघाई शहरात लॉकडाऊन केल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्न पदार्थ ऑनलाइन मागवावेत, शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.15 / 16कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 26 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत.16 / 16जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे. शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे