शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना चिनी सैन्याच्या वेगवान हालचाली; लवकरच हल्ला करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 8:19 PM

1 / 7
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेलं युद्ध तीन आठवडे उलटले तरीही सुरूच आहे. या कालावधीत युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. तर रशियालाही बराचसा फटका बसला आहे. एकीकडे या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना दुसरीकडे चिनी सैन्यानं वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
2 / 7
चीन सातत्यानं आपली ताकद दाखवत असतो. रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात होताच चीनच्या हवाई दलाची विमानं तैवानच्या हवाई हद्दीत घुसली होती. यानंतर आता चीनची विमानवाहू युद्धनौका तैवान सामुद्रधुनीतून रवाना झाली आहे. हा भाग संवेदनशील मानला जातो.
3 / 7
थोड्याच वेळात चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो हायडन यांच्यात संवाद होणार आहे. नेमक्या या संवादाआधी चिनी लढाऊ नौका तैवानच्या सामुद्रधुनीतून गेली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली.
4 / 7
चीननं सातत्यानं तैवानवर दावा सांगितला आहे. गेल्या दोन वर्षांत तैवानच्या आसपास चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चीनदेखील तैवानविरोधात तशीच कारवाई करू शकतो अशी चर्चा जगभरात आहे.
5 / 7
शेडोंग नावाची चीनची विमानवाहू नौका तैवान नियंत्रित बेट असलेल्या किनमेनजवळून रवाना झाली. हे बेट चीनच्या जियामेनच्या अगदी समोर आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास चिनी जहाज किनमेनच्या नैऋत्येला ३० नॉटिकल मैलांवर दिसलं.
6 / 7
तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता आणि स्थैर्य टिकवणं केवळ अमेरिकेच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या हिताचं असल्याचं अमेरिकेचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे माजी अध्यक्ष माईक मुलेन यांनी म्हटलं.
7 / 7
काही दिवसांपूर्वीच चीनच्या ९ लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. युक्रेनविरोधात रशियानं युद्ध पुकारल्यानंतर चिनी विमानं तैवानच्या हवाई हद्दीत शिरली. त्याआधी गेल्या नोव्हेंबरमध्ये चीनच्या २७ लढाऊ विमानांनी तैवानी हद्दीत घुसखोरी केली होती.
टॅग्स :chinaचीन