शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: ५८ टक्के लसीकरण, कडक लॉकडाऊन, तरीही या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले, तिसऱ्या लाटेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 1:50 PM

1 / 7
अत्यंत कडक लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले होते. मात्र शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ४ हजार १८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांमध्ये ब्रिटनमध्ये एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
2 / 7
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन हटवण्याची योजना अधांतरी लटकली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १ लाख २७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, ब्रिटनने कोरोनावरील अजून एका लसीला मान्यता दिली आहे. आता ब्रिटनमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोसच्या माध्यमातूनही लसीकरण होणार आहे.
3 / 7
देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. यावर्षी एक एप्रिलनंतर शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णंची नोंद झाली आहे. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार वाढत्या रुग्णसंख्येने संशोधकांची चिंता वाढवली आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका दिसू लागला आहे.
4 / 7
डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ब्रिटनमध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दररोज कोरोनाचे ७० हजार रुग्ण सापडत होते. मात्र त्या तुलनेत शुक्रवारी सापडलेले ४ हजार रुग्ण ही संख्या फार कमी आहे. मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येने सरकारची चिंता वाढवली आहे.
5 / 7
ब्रिटन सरकारने २१ जूनपासून लॉकडाऊनचे अनेक निर्बंध हटवण्याची योजना आखली होती. मात्र आता असे करणे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यामध्येच ब्रिटनमध्ये पब आणि बारमधील इंडोअर सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी दिली गेली होती.
6 / 7
ब्रिटनमधील नव्या रुग्णांमध्ये नव्या व्हेरिएंटमुळे बाधित झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे संसर्गाचा दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तज्ज्ञांनी कोरोना विषाणूच्या बी. १.६१७ व्हेरिएंटच्या प्रसाराबाबत खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
7 / 7
दरम्यान, शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ब्रिटनमध्ये ५८ टक्के लोकांनी कोरोनाविरोधीतील लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ३५ टक्के लोकांनी कोरोनावरील लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडLondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य