शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: भारतात कोरोना बेलगाम, पण पाकिस्तानने या जीवघेण्या साथीला असा घातला लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:16 PM

1 / 14
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या भारतात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंबदिवस वाढ होत आहे. दरम्यान, भारताचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानने मात्र कोरोनावर आश्चर्यकारकरीत्या नियंत्रण मिळवले आहे. पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
2 / 14
पाकिस्तानची खराब अर्थव्यवस्था आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा यामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मोठी हानी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पाकिस्तानातील कोरोनाची साथ आता नियंत्रणात आली आहे.
3 / 14
दरम्यान, पाकिस्तानमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला टोला लगावण्याची संधी सोडलेली नाही. इम्रान खान म्हणाले की, भारतातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तसेच पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने आता अडचणी वाढत आहेत. भारताने आपल्या देशातील गरीब लोकांची म्हणावी तशी काळजी घेतली नाही, असा आरोप इम्रान खान यांनी केला.
4 / 14
जेव्हा कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यास सांगण्यात आले तेव्हा मी सर्वप्रथम गरीब आणि समाजातील वंचित घटकांचा विचार केला. तेव्हा माझ्यावर टीका झाली. मला काही कळच नाही. मी देशाला बरबाद करेन, असे आरोप झाले.
5 / 14
माझ्या पक्षातील काही सदस्यांनीदेखील लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आमच्यी स्थिती इटली किंवा स्पेनसारखी नव्हती. जर आम्ही लॉकडाऊन केले असते तर एकाच खोलीत सहा-सात असे राहणारे लोक, मजूर आणि सामान्य लोकांसमोर संकट उभे राहिले असते, त्यामुळे मी याला विरोध केला. दरम्यान, बिल गेट्स यांनीसुद्धा पाकिस्तानमधील कोरोनाच्या घसरत्या आलेखाचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही इम्रान खान यांनी केला.
6 / 14
कोरोनाविरोधातील लढाईत मिळालेल्या यशासाठी इम्रान खान यांनी अल्लाहचे आभार मानले. तसेच दुर्दैवी भारतासारखी आमची परिस्थिती नाही. तर आम्ही त्या मोजक्या नशिबवान देशांपैकी आहोत जिथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे, असे विधानही इम्रान खान यांनी केले होते.
7 / 14
पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण २ लाख ९० हजार रुग्ण सापडले असून, आतापर्यंत सहा हजार २०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये कोरोनाचे केवळ ६१३ नवे रुग्ण सापडले. तर ११ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत पाकिस्तानमध्ये कोरोनाचे केवळ १२ हजार ११६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २ लाख ७२ हजार १२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
8 / 14
कोरोनाच्या वर्ल्डमीटरवरील माहितीनुसार १४ जून रोजी पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक ६ हजर ८२५ रुग्णांची नोंद झाली होती. तेव्हापासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. ३ ऑगस्ट रोजी पाकिस्तानात कोरोनाचे केवळ ३३१ रुग्ण सापडले होते.
9 / 14
दुसरीकडे भारताता मात्र कोरोनाचा कहर सुरू हे. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २७ लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ५२ हजार ८८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आलेख सातत्याने वाढत असून, मंगळवारी देशात ६४ हजार ५३१ एवढे रुग्ण सापडले.
10 / 14
मात्र कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या बाबतीत भारत आणि पाकिस्तान या दोघांचीही आकडेवारी तितकीशी समाधानकारक नाही. पाकिस्तानमध्ये सध्या दर दहा लाख लोकसंख्येमागे ९ हजार ८७८ कोरोना चाचण्या होत आहेत. तर भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे १८ हजार ८३१ चाचण्या होत आहेत.
11 / 14
मात्र असे असले तरी पाकिस्तानमधील कोरोना विषाणूचा घसरत असलेला आलेख जगात चर्चेचा विषय ठरला आहे. बिल गेट्स यांनीही याची दखल घेतली होती. तर भारतातील कोरोनाच्या सद्यस्थिती बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
12 / 14
पाकिस्तानने कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर आर्थिक स्थितीचा विचार करून पूर्णपणे लॉकडाऊन लागू केले नव्हते. केवळ जिथे कोरोनाचे हॉटस्पॉट होते अशाच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच देशातील धार्मिक स्थळे आणि मशिदीसुद्धा बंद केल्या नव्हत्या.
13 / 14
मात्र सोशल डिस्टंसिग आणि मास्क परिधान करण्यासह अन्य काही नियम लागू करण्यात आले होते. मात्र पाकिस्तानातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे आणि तरुण लोकसंख्येमुळे येथील लोकसंख्येमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यू झालाय. तर भारतात हेच प्रमाण ३३ इतके आहे.
14 / 14
दरम्यान, पाकिस्तानमध्ये या महिन्यात रेस्टॉरंट आणि थिएटर्स उघडण्यात आली आहेत. तसेच ८ ऑगस्टपासून पर्यटन स्थळे उडण्याचीही परवानगी दिली गेली आहे. दरम्यान, मेडिकल मायक्रोबायोलॉजी आणि इन्फेक्शियस डिसीजेस सोसायटी ऑफ पाकिस्तानने इम्रान खान यांनी केलेल्या स्मार्ट लॉकडाऊनचे कौतुक केले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयImran Khanइम्रान खान