शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:53 AM

1 / 12
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 12
कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 446,721,728 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,020,582 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 379,869,871 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
3 / 12
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
4 / 12
चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
5 / 12
चीनमध्ये कोरोनाचे 526 नवे रुग्ण आढळून आले आहे, जी गेल्या दोन वर्षांत एका दिवसात सर्वाधिक संसर्गाची संख्या आहे. त्यापैकी 214 रुग्णांमध्ये लक्षणं आहेत. तर 312 रुग्ण लक्षणे नसलेले होते.
6 / 12
चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
7 / 12
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या किंगडाओ शहरात ओमायक्रॉनची 88 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमाक्रॉनचे लागण झालेले सर्व विद्यार्थी असल्याचं सांगितले जातं. चीनमध्ये या वर्षात एका दिवसात झालेल्या संसर्गाची ही सर्वाधिक संख्या असल्याचंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
8 / 12
काही दिवसांपूर्वी चीनमधील एका शहरात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या तिन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं पाहायला मिळाली नाही.
9 / 12
चीनच्या यूझूमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली होता. या शहराची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे.
10 / 12
गेल्या काही दिवसांत येथे तीन रुग्ण आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.
11 / 12
शहरात आधीच बस आणि टॅक्सी सेवा बंद करण्यात येत असल्याची तसेच शॉपिंग मॉल्स, म्युझियम आणि पर्यटनस्थळं बंद करत असल्याची घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून चीनमधील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.
12 / 12
चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत होते. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीन