शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! 'या' शहरात पुन्हा लॉकडाऊन; लाखो लोक घरामध्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 2:32 PM

1 / 14
संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 14
चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधील सर्वात मोठं शहर असलेल्या शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3 / 14
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील काही भागांमध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे, असं शांघाईच्या स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
4 / 14
चीनच्या शांघाई शहरात लॉकडाऊन केल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्न पदार्थ ऑनलाइन मागवावेत, शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
5 / 14
कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 26 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत.
6 / 14
जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे.
7 / 14
शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत आणि आवश्यकता असेल त्या परिसरात ताबोडतोब लॉकडाऊन करावे.'
8 / 14
कोरोनाला रोखण्यासाठी चीननं याआधीच जगातील सर्वात कठोर 'झिरो कोविड पॉलिसी' लागू करण्याची घोषणा केली होती. तसंच चीनकडून सीमेवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
9 / 14
देशात मोठ्या प्रमाणावर डिजिटल ट्रॅकिंग आणि चाचणी सुरू आहे. मात्र असं असतानाही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश येत आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने टेन्शन वाढलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
कोट्यवधी लोकांना कोरोनाची लस दिल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही लसही फेल ठरत आहे. यामुळेच चीनचे लोक आता ऑनलाईन आपला राग व्यक्त करत आहेत. एवढेच नाही तर चीनच्या शून्य कोविड धोरणावर प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
11 / 14
चीनचे टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन शहरात रविवारी लोकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. हे लोक शहरात खूप दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करत होते.
12 / 14
जगभरातील कोरोना व्हायरसची प्रकरणे 47.86 कोटींवर पोहोचली आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत 61.1 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10.86 अब्जाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
13 / 14
शांघायमध्ये शाळा आणि उद्याने बंद करण्यात आली आहेत, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले.
14 / 14
जग जेव्हा या महामारीच्या विळख्यात सापडले होते, तेव्हा चीनचा बचाव झाला होता, परंतु आता कोरोना प्रकोपावर नियंत्रण मिळवण्यात तो असमर्थ असल्याचं दिसून येत आहे. देशातील कोट्यवधी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन