शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:35 IST

1 / 10
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक अशा घोषणा केल्या आहेत ज्यामुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. त्यातीलच ट्रम्प यांच्या एका निर्णयानं भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसारखे देश संकटात आलेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका फर्स्ट अजेंडा अंतर्गत सर्व परदेशी मदत स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
2 / 10
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, सध्या सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला जाईल त्यानंतरच अमेरिका कुठल्या देशाला आर्थिक मदत करायची की नाही हे ठरवेल. तोपर्यंत अमेरिकेकडून जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेले अर्थ सहाय्य कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
3 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्यावेळी ज्या निर्णयांवर स्वाक्षरी केली त्यात परदेशी सहाय्य याचाही निर्णय होता. ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की, परदेशात विकासासाठी दिला जाणारा निधी तात्काळ पुढील ९० दिवसांसाठी रोखला जावा आणि जे काही विकास कार्यक्रम सुरू आहे त्याचा फेर आढावा घ्यावा असा आदेश दिला.
4 / 10
टम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जवळपास सर्वच फंडिंग थांबवल्या आहेत. या आदेशातून इस्त्रायल, मिस्त्र आणि अमेरिकेच्या मुख्य मध्य पूर्वेकडील सहकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. जर अमेरिकन लोकांना लाभ होणार नसेल तर आम्ही बेसुमार खर्च करणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
5 / 10
अमेरिका जगातील असा एकमेव देश आहे ज्याने २०२३ मध्ये परदेशी मदत म्हणून ७२ अब्ज डॉलर्स वाटप केले. ज्यात आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजेन्सीच्या माध्यमातून बांगलादेशाला ४०.१ कोटी डॉलर, पाकिस्तानला २३.२ कोटी डॉलरचा समावेश आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात अनेक विकासाचे प्रकल्प अमेरिकेच्या मदतीवर सुरू आहेत परंतु ट्रम्प यांच्या आदेशाने या प्रकल्पांचे काम थांबले आहे. पाकिस्तानच्या सांस्कृतिक संरक्षण प्रकल्पासाठी एंबेसडर फंड निलंबित केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील ५ महत्त्वाचे प्रकल्पही बंद केलेत.
6 / 10
ट्रम्प यांच्या आदेशाने पाकिस्तानच्या आर्थिक विकासाशी संबंधित ४ मोहिमेवर परिणाम झाला आहे. ५ कृषी विकास प्रकल्पाचं कामही मंदावले आहे. त्याशिवाय लोकशाही, मानवाधिकार आणि शासनाशी संबंधित फंडिंगही अनिश्चित काळासाठी रोखली आहे. ४ शिक्षण आणि ४ आरोग्य प्रकल्पही ठप्प झालेत.
7 / 10
अमेरिकेने घेतलेला हा निर्णय तात्पुरता असला तरीही या सर्व विकास प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर हे प्रकल्प पुन्हा सुरू करायचे की नाहीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मागील २० वर्षात अमेरिकेने पाकिस्तानला ३२ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली आहे.
8 / 10
अमेरिकन सरकारी वेबसाईटनुसार, पाकिस्तान अमेरिकेची मदत घेणारा जगातील २० वा मोठा देश आहे. अमेरिकेकडून येणारी मदत थांबल्याने पाकिस्तानातील शहबाज शरीफ सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. हा देश आधीच आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणाऱ्या पॅकेजवर चालत आहे. त्यात पाकिस्तानात महागाई, बेरोजगारीचं कळस गाठला आहे. पाकिस्तानातील सर्वसामान्य लोक शिक्षण, आरोग्य आणि मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यात अमेरिकेच्या मदतीने सुरू असलेले विकासाचे प्रकल्प थांबल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशालाही अमेरिकेकडून मोठी आर्थिक मदत केली जाते.
9 / 10
दिर्घकाळापासून बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा सामना करणाऱ्या बांगलादेशात शैक्षणिक प्रकल्प सुरू आहेत. जगातील टॉप १० देशांमध्ये बांगलादेशाचा समावेश आहे ज्याला अमेरिका सर्वाधिक मदत करतो. मागील डिसेंबरच्या आकडेवारीनुसार बांगलादेशाला ४९ कोटी डॉलर मदत केली आहे. बांगलादेशात खाद्य, शिक्षण, सुरक्षा आणि विकास यासाठी अमेरिकेवर निर्भर राहावे लागते.
10 / 10
भारताचा शेजारी नेपाळ देशालाही अमेरिकेकडून मदत मिळते. नेपाळच्या विकास कामांमध्ये अमेरिकेचे मदत घेणारा तो जगातील १९ वा देश आहे. नेपाळच्या आरोग्य, शिक्षण, कृषी, विकास, आर्थिक विकास, मानव सहाय्य, महिला आणि बालकल्याणसारख्या क्षेत्रात अमेरिका मदत करते. ट्रम्प यांच्या आदेशाने नेपाळलाही धक्का बसला आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानNepalनेपाळ