लंडन, दि. 15 - ब्रिटनची राजधानी लंडन शुक्रवारी सकाळी स्फोटाने हादरली. लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा आठच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी हा स्फोट झाला. यामध्ये जवळपास 20 प्रवासी जखमी झाले असल्याचं वृत्त 'द सन'ने दिलं आहे. स्फोट झाल्यानंतर स्टेशनवरील प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला त्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिलं आहे.दक्षिण लंडनच्या पार्सन्स ग्रीन स्टेशनवर हा स्फोट झाला. पांढऱ्या रंगाच्या एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलेल्या आयईडी(IED)चा हा स्फोट झाल्याची माहिती आहे.घटनास्थळी पोलीस आणि रूग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्फोट झाल्यापासून पोलिसांनी पार्सन्स ग्रीन स्टेशनला गराडा घातला आहे.रेल्वे सेवा थोड्यावेळासाठी थांबवण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट झालं आहे. (फोटो सौजन्य- reuters.com)