ऑनलाइन लोकमतबर्लिन, दि. २२ - जर्मनीच्या दक्षिणेकडील म्युनिच शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटरमध्ये एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ९ जण ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या हल्लेखोराने नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे. या अंदाधुंद गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान निरपराध नागरिकांवर हल्ला करणारा हल्लेखोर मूळचा इराणी असून त्याचे नाव अली सोमीबॉय असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा हल्ला झाला.ऑलिम्पिया मॉलमधील हल्ल्यानंतर एक हल्लेखोर जवळच्याच मेट्रो स्टेशनच्या दिशेने पळाल्याची माहिती असून हल्ल्याची माहिती मिळताच जर्मन पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान संपूर्ण परिस्थिती व तणाव निवळेपर्यंत पोलिसांनी लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले. दरम्यान या हल्ल्याची जबाबादारी अद्याप कोणीही स्वीकारली नसल्याने हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दहशतवादी हल्ल्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांनी सुरक्षा परिषद बोलावली आहे. या सुरक्षा परिषदेत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे. परिषदेचे सदस्य दहशतवादी हल्ल्याची सर्व माहिती गोळा करून त्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती मार्केल यांचे स्टाफ प्रमुख पीटर अल्मायर यांनी दिली आहे. स्थानिक पेट्रोलपंपावर काम करणार्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही रुग्णवाहिका पाहिल्या. काही वेळातच पोलिसांनी संपूर्ण परिसर आणि रस्ता रिकामा केला. लोक भीतीने सैरावैरा पळत होते. शॉपिंग सेंटरमध्ये काम करणार्या महिलेने सांगितले की हल्लेखोर काळय़ा कपड्यात होता. तसेच त्याने मास्क घातलेला होता. ऑलिम्पिया शॉपिंग सेंटर मधल्या मॅकडोनाल्ड या रेस्टॉरंटबाहेर हा हल्ला झाला. मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर जवळच्या मेट्रो स्टेशनकडे पळाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी म्युनिच रेल्वे स्टेशन खाली केलं. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी मेट्रो आणि बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.