शेकडो वर्षे जुन्या मंदिराला ज्यांनी लावली आग, त्यांना आता पाकिस्तानमधील हिंदू करणार माफ By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:38 PM
1 / 5 गतवर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात हिंसक जमावाने शेकडो वर्षे जुने हिंदू मंदिर तोडले होते, तसेच त्याला आग लावली होती. आता या जाळपोळीतील आरोपींना माफ करण्याचा निर्णय तेथील हिंदू समाजाने घेतला आहे. हा वाद सोडवण्यासाठी मौलवी आणि हिंदू समाजामध्ये शनिवारी एक बैठक झाली होती. 2 / 5 या बैठकीमध्ये आरोपींनी मंदिरावर हल्ला करणे आणि १९९७ मध्ये अशाच प्रकारचे कृत्य करण्याबाबत माफीची मागणी केली आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी देशाच्या घटनेनुसार हिंदू आणि त्यांच्या अधिकारांचे पूर्ण रक्षण करण्याचे आश्वासन दिले. आरोपींना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी बैठकीत तडजोड झाल्यानंतर याला कायदेशीर रूप देण्यासाठी पाकिस्तानच्या सुप्रिम कोर्टात सादर केले जाईल. 3 / 5 गतवर्षी ३० डिसेंबर रोजी काही स्थानिक मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी पक्ष जमियत उलेमा ए इस्लामच्या सदस्यांच्या नेतृत्वात जमावाने मंदिर आणि एका समाधीची मोडतोड केली होती. तसेच खैबर पख्तुनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावामध्ये आग लावली होती. स्थानिक उलेमांशी बैठक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानी हिंदू परिषदेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितले की, या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 4 / 5 पाकिस्तान तहरिक ए इन्साफ पक्षाचे खासदार असलेल्या रमेश कुमार यांनी सांगितले की, केपीके चे मुख्यमंत्री महमूद खान यांनी जिरगा बैठकीमध्ये अध्यक्षपद भूषवले आणि हे प्रकरण शांततेच्या मार्गाने मिटवल्याबद्दल आभार मानले. महमूद खान यांनी जिरगाच्या सदस्यांना संबोधित करताना या हल्ल्याच्या निषेध केला. तसेच हा प्रकार प्रांतामधील शांततामय वातावरणाला बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 5 / 5 या मंदिरावरील हल्ल्याचा मानवाधिकार कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या नेत्यांनी निषेध केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या मंदिराचे नव्याने बांधकाम करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सुमारे ५० जणांना अटक करण्यात आली होती. भारतानेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता. आणखी वाचा