शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताने हसीनांना आगरतळापर्यंत येण्यास सांगितलेले, सोमवारी बांगलादेशात नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 11:56 AM

1 / 9
हसीना सध्या भारतात आहेत. हिंडन एअरबेसऐवजी त्यांना त्रिपुरातील आगरतळा विमानतळावर यायचे होते. परंतू परिस्थिती अशी बनली की त्यांना बांगलादेशच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या व ढाका पासून दूर असलेल्या त्रिपुराला जायचे सोडून हिंडनला यावे लागले. ब्रिटनने नियम दाखवून राजाश्रय देण्यास नकार दिला, यामुळे त्यांना सध्या भारतातच रहावे लागत आहे.
2 / 9
सोमवारी दुपारी त्यांनी बांगलादेश सोडला, त्यापूर्वी रविवारी रात्रीपासून बांगलादेशात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. जेलमध्ये बंदी असलेल्या अनेक नेत्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारीच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या दिवसात हिंसाचारात १०० जणांचा मृत्यू झाला होता. हसीना यांना याची माहिती दिली गेली परंतू त्या आपला हट्ट सोडायला तयार नव्हत्या.
3 / 9
सैन्याच्या मदतीने आपण हे आंदोलन मोडून काढू असे त्यांना वाटत होते. परंतू, सैन्याने ऐनवेळी साथ दिली नाही. आणखी मृत्यू सैन्याला नको होते. रात्रीच याची कल्पना हसीना यांना देण्यात आली. यामुळे रविवारीच हसीना यांनी राजीनामा देण्याचा विचार सुरु केला होता.
4 / 9
हसीना यांच्या प्लॅनबाबत कोणाला फारशी माहिती नव्हती. हसीना यांनी कधी राजीनाम्यावर सही केली आणि त्या कधी निघून गेल्या हे फक्त स्पेशल सिक्युरिटी फोर्स, प्रेसिंडेंट गार्ड आणि सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनाच माहिती होते, असे सैन्याच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
5 / 9
अखेरच्या क्षणापर्यंत हसीना यांना सत्ता सोडायची नव्हती. त्यांना दोन पर्याय खुले ठेवायचे होते. पहिला हा की त्या देश सोडून बाहेर जातील आणि दुसरा की सैन्य बळाचा वापर करून अखेरपर्यंत सत्तेत राहतील. परंतू, सैन्याने यास स्पष्ट नकार दिला आणि हसीनांसमोर एकच पर्याय उरला होता.
6 / 9
सोमवारी सकाळी पोलीस आणि सैन्यासोबत हसीना यांनी बैठक घेतली होती. सैन्याने गणभवनाकडे जाणारे रस्ते बंद केले होते. प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. हसीना यांनी देशाबाहेर जायचे म्हटले तर तेजगाव विमानतळापर्यंत त्यांना बिनदिक्कत पोहोचविता यावे असा सैन्याचा प्लॅन होता. यामुळे इंटरनेटही बॅन करण्यात आले होते.
7 / 9
सैन्य पोलिसांसोबतच्या बैठकीत हसीना यांनी परिस्थिती समजून घेतली. आंदोलक कोणत्याही क्षणी गणभवनात घुसू शकतात, त्यांना नियंत्रित करणे आता शक्य नसल्याचे हसीना यांना सांगण्यात आले. यामुळे देश सोडणेच हसीना यांच्यासमोर उरले होते.
8 / 9
देश सोडल्यानंतर हसीना कुठे जातील, राहतील याबाबत भारताशी आधीच चर्चा झालेली होती. यामध्ये भारताने हसीना यांना आगरतळापर्यंत येण्यास सांगितले होते. त्या आगरतळापर्यंत आल्या तर त्यांना दिल्लीला नेले जाईल असे भारताने सांगितले होते. परंतू, ऐन क्षणाला ते शक्य झाले नाही. ढाक्यापासून बांगलादेशच्या दुसऱ्या बाजुला आगरतळा होते.
9 / 9
लाखोंच्या संख्येने जमाव जमल्याने हवाई दलाचे हेलिकॉप्टर गणभवनात उतरविण्यात आले व तिथून त्यांना विमानतळावर नेले गेले. तिथून त्या विमानात बसून भारतात दाखल झाल्या. यावेळी हसीना यांच्यासोबत हवाई दलाचे सात अधिकारी होते. भारतीय हद्दीत आल्यावर राफेलनी त्यांच्या विमानाला संरक्षण दिले होते.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश