शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine: चीनची कोरोना लस घेणं पडलं महागात; ‘या’ देशात लसीचे दोन्ही डोस घेऊनही २० डॉक्टरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 1:13 PM

1 / 13
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. यातच कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे नवी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रत्येक देशाने कोरोना लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे.
2 / 13
याचवेळी इंडोनेशियामधून एक बाब उघडकीस आली आहे. याठिकाणी लसीचे दोन्ही डोस दिलेल्या जवळपास १२ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने इंडोनेशियात खळबळ माजली आहे. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली चीनची लस पुन्हा चर्चेत आली आहे.
3 / 13
चीनच्या सिनोवॅक बायोटेक आणि सिनोफार्म(Chinese Covid 19 Vaccines Sinopharm and Sinovac Biotech) या लसीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्याचसोबत सध्या देशात डेल्टा प्लस व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे.
4 / 13
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इंडोनेशियाई मेडिकल असोसिएशनच्या हवाल्याने सांगितलं आहे की, देशातील २० डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे तेच डॉक्टर्स आहेत ज्यांनी चीनची सिनोवॅक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्याशिवाय आणखी ३१ डॉक्टरांचा मागील ५ महिन्यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूंची चौकशी सुरू आहे.
5 / 13
लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वाढणाऱ्या कोरोना संक्रमणानंतर चीनने उत्पादीत केलेल्या सिनोवॅक लसीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. तर चीनची लस घेणारे इतर देश नव्या व्हेरिएंटमुळे त्रस्त आहेत. यात मंगोलिया, बहिरन, सेशेल्समध्ये चीनची लस देण्यात आली होती. या देशात कोरोना संक्रमणात वाढ झाली आहे.
6 / 13
रिपोर्टनुसार, मागील एका आठवड्यात चीनची लस घेतलेले देश कोरोना संक्रमणाच्या टॉप १० देशांच्या यादीत आले आहेत. विज्ञान पत्रिका Our World in Data मध्ये लिहिण्यात आलं आहे की, हे सर्व देश ते आहेत. जिथे ५० ते ६८ टक्के लोकसंख्येला चीनच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत. या देशात चिलीचाही समावेश आहे.
7 / 13
मंगोलियाने जेव्हा चीन लसीसोबत करार केला तेव्हा तेथील सरकारनं त्यांच्या लोकांना कोविड फ्री समरचं आश्वासन दिलं. बहरिनमध्ये सांगण्यात आलं की, लस घेतल्यानंतर लोक सामान्य जीवनात परततील. तर सेशल्समध्ये पुन्हा एकदा सर्वकाही सुरळीत सुरू होईल असं सांगितलं होतं.
8 / 13
या सर्व देशांमध्ये लसीकरणानंतरही वाढत्या कोरोना संक्रमणामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे चीनची लस प्रभावी नाही हे सिद्ध झालं आहे. चीनच्या लसीचा कोणताही डेटा सार्वजनिक स्वरुपात लोकांच्या समोर आला नाही. किती लोकांवर त्याचे ट्रायल झाले किती यशस्वी झाली हे दडवून ठेवलं आहे.
9 / 13
चीनच्या लसीचं ट्रायल इतर देशांमध्ये करण्यात अनेक समस्या आल्या. अनेक देश चीनच्या लस चाचणीत सहभागी होण्यास तयार नव्हते. पाकिस्तानच्या लाहोरमध्येही चीनच्या लसीची चाचणी घेण्यास स्थानिकांनी विरोध केला. याठिकाणी लस घेतल्यानंतर अनेक आजार आणि पुरुष नंपुसक होण्याची भीती लोकांमध्ये होती.
10 / 13
इतकचं नाही तर चीनमध्ये सिनोवॅकची चाचणी घेण्यासही विरोध झाला होता. त्यानंतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीनं लसीची चाचणी घेण्यात आली. लोकांवर दबाव टाकून चीनमध्ये लसीची चाचणी घेत असल्याबाबत अनेक बातम्या आंतरराष्ट्रीय मीडियात प्रसिद्ध झाल्या होत्या.
11 / 13
लवकर उपलब्ध होत असल्यानं जगातील ९० देशांनी चीनच्या लसीसोबत करार केला आहे. खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लसीचा प्रचार केला होता. ही लस लवकरात लवकर दुसऱ्या देशांना उपलब्ध करून देऊ असं ते म्हणाले होते.
12 / 13
अलीकडेच चीनच्या लसीवर निर्माण होणाऱ्या प्रश्नचिन्हामुळे अनेक देशांनी या लसीवर बंदी आणली आहे. ज्या लोकांनी चीनची लस घेतली आहे त्यांना इतर देशांचा व्हिसा नाकारण्यात येत आहे. आता केवळ फायझर, मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करून दिला जात आहे.
13 / 13
वाढत्या कोरोना संक्रमणामुळे चीनसोबत करार केलेल्या अनेक देशांनी आता त्यांच्या देशात फायझर आणि एस्ट्राजेनेका लसीचे डोस घेतले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, बहरिनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात लसीकरणानंतरही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या