शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Iran Hijab Protest: इराणमध्ये 'हिजाब' विरोधात महिलांची क्रांती; केस कापून-हिजाब जाळून सरकारविरोधात तीव्र निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 1:59 PM

1 / 11
तेहरान: इराणमध्ये महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोल सुरू आहे. देशातील अनेक ठिकाणी महिला आंदोलन करत आहेत. राजधानी तेहरानमध्ये अनेकदा परिस्थिती सुरक्षा दलांच्या नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे त्यांना अश्रुधुराच्या नळकांड्या आणि गोळीबार करावा लागला. या सर्व निदर्शनांदरम्यान इराण पोलिस प्रमुखाला पदावरून हटवण्यात आले आहे.
2 / 11
नेमकं काय झालं ?- 22 वर्षीय इराणी तरुणी महसा हिला हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीतच तिचा मृत्यू झाला, त्यानंतर लोकांचा राग उफाळून आला आणि तेहरानपासून देशाच्या विविध भागात लोकांनी निदर्शने सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या निदर्शनांमध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
3 / 11
इराणच्या दिवांदरराह टाउनमध्ये झालेल्या निदर्शनात जखमी झालेल्या फौआद कादिमी आणि मोहसीन मोहम्मदी या दोन नागरिकांचा कोसार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इराण पोलिसांनी महसा अमिनीच्या मृत्यूला दुर्दैवी घटना म्हटले आहे. कोठडीत महसा अमिनीला शारीरिक दुखापत झाल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.
4 / 11
तेहरान पोलीस कमांडर हुसेन रहीमी यांनी सांगितले की, महसा अमिनीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून अशी घटना पुन्हा घडू नये अशी आमची इच्छा आहे. याप्रकरणी इराण पोलिसांवर चुकीचे आरोप केले जात आहेत, असे रहिमी पुढे म्हणाले. कोठडीत अमिनी यांना कोणत्याही प्रकारे इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोठडीत पोलिसांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
5 / 11
घटनेवरुन अमेरिका कठोर- व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने महशाच्या मृत्यूबद्दल सांगितले की, अमेरिकेला या प्रकरणी उत्तरदायित्व हवे आहे. महसा अमिनीचा हिजाब योग्य प्रकारे न घातल्यामुळे पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा मानवी हक्कांचा मोठा अपमान आहे. इराणमधील महिलांना हिंसा आणि छळ न करता स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार असावा. इराणने आता महिलांवरील अत्याचार थांबवले पाहिजेत.
6 / 11
महसा अमिनीला 13 सप्टेंबर रोजी अटक- मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील बहुतेक निदर्शने इराणची राजधानी तेहरान आणि इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मशाद येथे होत आहेत. निदर्शनांमध्ये सहभागी शेकडो महिला महसा अमिनी यांच्या मृत्यूच्या विरोधात घोषणा देत आहेत. निदर्शनांमध्ये महिला आपला हिजाब काढून निषेध करत आहेत. महसा अमिनीला पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली होती.
7 / 11
अटक केल्यानंतर पोलीस कोठडीतच तिची प्रकृती अचानक बिघडली आणि तीन दिवस कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. मात्र, महसा अमिनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर अमिनीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, महसाला पोलिस कोठडीत घेण्यापूर्वी ती पूर्णपणे बरी होती. पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळेच महसाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
8 / 11
महसा अमिनी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच लोक संतापले. महिलांनी सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी महसा अमीनला दफन करण्यात आले, त्या दिवशी तिच्या घराजवळ सुमारे 500 लोकांच्या जमावाने निदर्शने केली, त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. आंदोलकांच्या अटकेने लोकांमध्ये आणखी भर पडली. सोमवारी हजारो लोकांनी उग्र निदर्शने केली. यादरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.
9 / 11
महसा अमिनी यांच्या मृत्यूवर महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोल केलेच, पण काही महिला सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. अनेक महिलांनी स्वतःचे केस कापतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतर महिलाही विविध मार्गाने निषेध नोंदवत आहेत. निदर्शने करताना अनेक महिलांनी आपले हिजाबही काढून रस्त्यावर फेकले. अनेक ठिकाणी हिजाब जाळण्यात आला.
10 / 11
हिजाबबाबत इराणमध्ये काय नियम आहेत? इस्लामिक देश असल्याने इराणमध्ये शरिया कायदा पूर्णपणे लागू आहे. या कायद्यानुसार इराणमध्ये सात वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही मुलीला केस उघडून बाहेर पडण्याची परवानगी नाही. तसेच, 7 वर्षांपेक्षा मोठ्या मुलींना सैल कपडे घालण्यास सांगितले जातात. 5 जुलै रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी देशात हिजाब कायदा लागू केला.
11 / 11
त्याची अंमलबजावणी होताच हिजाबबाबत नियम कडक बनले आहेत. महिलांनी हा नियम मोडला तर त्यांना दंड किंवा अटकही होऊ शकते. महसा अमिनी हिलाही तेहरानच्या पोलिसांनी हिजाब नीट न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये महिलांच्या निदर्शनांचा इतका परिणाम झाला आहे की, निदर्शनामुळे सरकार चिंतेत आले आहे.
टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीयagitationआंदोलनWomenमहिला