शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: चीनचा थयथयाट! कोरोनाचा उगम शोधायचाय? मग अमेरिकेत जा; WHO विरोधातही संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 2:55 PM

1 / 10
जागतिक स्तरावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरक्षः थैमान घातले आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
अथक परिश्रम, मेहनत आणि प्रयत्नांनंतर कोरोनाची लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, आता त्यावर जगातील सर्वच देश भर देत आहेत. कोरोना लसीकरण हाच यावरील एकमेव रामबाण उपाय असल्याचे वारंवार सांगितले जात आहे.
3 / 10
कोरोना विषाणू संसर्गाचा उगम शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट करत ही मागणी फेटाळून लावली होती.
4 / 10
चीनमधील कोरोना विषाणू उत्पत्तीच्या दुसऱ्या फेरीच्या तपासणीची मागणी तीव्र होत असतानाच, चीनने अमेरिकेवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील फोर्ट डेट्रिक जैविक प्रयोगशाळेची चौकशी केली पाहिजे, असे टोला जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) लगावला आहे.
5 / 10
प्रयोगशाळांची चौकशी करायची असेल तर, WHO च्या तज्ज्ञांनी फोर्ट डेट्रिकला जायला हवे. अमेरिकेने शक्य तितक्या लवकर पारदर्शक आणि जबाबदारीने काम केले पाहिजे आणि WHO च्या तज्ज्ञांना फोर्ट डेट्रिक लॅबच्या चौकशीसाठी बोलवले पाहिजे. या मार्गानेच जगासमोर सत्य बाहेर येऊ शकते, असे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे.
6 / 10
कोरोनाच्या पहिल्या घटना वुहानमध्ये नोंदल्या गेल्याने चिनी शहरातील प्रयोगशाळेला मुख्य संशयित मानले जात आहे. चीनने याचा कडाडून विरोध केल असून, आरोप केला आहे की, चीनच्या प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याचा सिद्धांत मांडणाऱ्यांनी अमेरिकेतील फोर्ट डेट्रिक जैविक प्रयोगशाळेची चौकशी केली पाहिजे.
7 / 10
वुहानमधील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेची तपासणी करण्यासह चीनमध्ये कोरोनाच्या उत्पत्तीच्या पुढील टप्प्यासाठीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावर चीनने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन फोर्ट डेट्रिक बायोलॅबची तपासणी करण्यासाठी चिनी नेटिझन्सनी स्वाक्षर्‍यांची मोहिम सुरू केली होती.
8 / 10
यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या प्रयोगशाळेची तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. या स्वाक्षर्‍याची संख्या १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. यावर, अमेरिकेने यावर प्रतिक्रिया दिली नसून, अमेरिकेतून या सिग्नेचरच्या सर्व्हरवर हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
9 / 10
फोर्ट डेट्रिक येथील जैविक प्रयोगशाळेच्या संदर्भातील सर्व शंकांबाबत अमेरिकेने उत्तर दिले पाहिजे. १३ दशलक्षाहून अधिक चिनी नेटिझन्सनी न्यायाची मागणी केली असताना ते अजूनही शांत का आहे? आता दावा करणारी पारदर्शकता कुठे आहे?, अशी विचारणा झाओ लिजियांग यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
10 / 10
जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील पथकाने मार्चमध्ये वुहानला भेट दिली होती. आरोग्य संघाच्या सदस्यांनी करोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी तेथे चार आठवडे संशोधन केले होते. पण या काळादरम्यान चिनी संशोधक सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंगJoe Bidenज्यो बायडनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना