Narendra Modi :...त्यामुळे मोदींना इस्लामाबादमध्ये यावे लागले, नवाझ शरिफ यांच्या कन्येचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 16:28 IST
1 / 8भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ च्या अखेरीच अफगाणिस्तानच्या दौऱ्यावरून परतताना अचानक इस्लामाबदचा दौरा करत पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. दरम्यान, या भेटीचा आधार घेऊन आता नवाझ शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. 2 / 8मरियम शरीफ यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यांचा आधार घेत इम्रान खान यांना लक्ष्य केले आहे. मरियम नवाझ यांनी पीएमएल-एन च्या युवा संमेलनामध्ये संबोधित करताना इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. 3 / 8नवाझ शरीफ हे सध्या लंडनमध्ये वास्तव्य करून आहेत. तर मरियम नवाझ ह्या पीएमएल-एन पक्षाचे नेतृत्व करत आहे. संमेलनामध्ये मरियम म्हणाल्या की, नवाझ शरीफ यांचे व्हिजन पाहा. त्यांच्या व्हिजनमुळेच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर आकारास आला. नवाझ शरीफ यांच्या व्हिजनमुळेच वाजपेयी आणि नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले. 4 / 8मरियम पुढे म्हणाल्या की, नवाझ शरीफ यांची हिंमत पाहा, इम्रान खान यांनी पनामा आणले मात्र माझे वडील झुकले नाहीत. पनामा आल्यानंतर राजीनामा देण्यास सांगण्यात आले. मात्र नवाझ शरीफ यांनी राजीनामा दिला नाही. तसेच ते घरीही गेले नाहीत. नवाझ शरीफ यांनी जनतेचा आवाज बुलंद ठेवला. जेव्हा काहीच चालले नाही. तेव्हा त्यांना खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.5 / 8नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी १९९९ मध्ये बसने पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये अफगाणिस्तानवरून येताना अचानक पाकिस्तानमध्ये उतरले होते. त्या दिवशी नवाझ शरीफ यांचा जन्मदिन होता. मात्र या भेटीमधून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारले नव्हते. उलट या दौऱ्यानंतर भारतातील पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. 6 / 8१९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर पाकिस्तानने कारगिलवर हल्ला केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांची या हल्ल्यामागे मोठी भूमिका होती. त्यामुळे वाजपेयींचा तो पाकिस्तान दौराही टीकेचा विषय बनला होता. पंतप्रधान चर्चेसाठी पाकिस्तानात गेले होते. तर पाकिस्तान हल्ल्याची तयारी करत होता, सरकारची गुप्तचर यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे, असा घणाघात विरोधकांनी केला होता. 7 / 8दुसरीकडे डॉ. मनमोहन सिंह हे १० वर्षे भारताचे पंतप्रधान होते. मात्र या दहा वर्षांत त्यांनी एकदाही पाकिस्तानचा दौरा केला नव्हता. काँग्रेस ही बाब आपले यश म्हणून सादर करत असते. डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म अविभाज्य भारतात झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानमध्ये आहे. 8 / 8मरियम नवाझ यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींचे पाकिस्तान दौरे हे नवाझ शरीफ यांच्या धोरणांचे यश म्हणून मांडले. मात्र या दोन्ही दौऱ्यांनंतर पाकिस्तानने भारताचा विश्वासघात करत मोठे हल्ले केले होते. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दीर्घकाळापासून बंद आहे. आता पाकिस्तानकडून एखादा प्रस्ताव गेला तरी भूतकाळातील अनुभव पाहून भारत त्याबाबत फारसा उत्साह दाखवत नाही.