Afghanistan Crisis: 'अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही', तालिबानी प्रवक्त्याचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:52 AM
1 / 10 तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सरकारमधील विविध मंत्र्यांच्या नावांची घोषणा तालिबानी नेत्यांकडून केली जात आहे. अशातच काही धक्कादायक विधानं देखील आता तालिबानी नेते करु लागले आहेत. 2 / 10 अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या ९/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन होता याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नव्हता, असं विधान तालिबानी प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यानं केलं आहे. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या प्रवक्त्यानं हे विधान केलं आहे. 3 / 10 'तब्बल २० वर्षांच्या युद्धानंतरही अमेरिकेवरील ९/११ हल्ल्यामागे ओसामा बिन लादेनचा हात असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तालिबानसोबतच्या युद्धासाठी अमेरिकेकडे कोणतंही ठोस कारण नव्हतं', असं तालिबानी प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यानं म्हटलं आहे. 4 / 10 याच जबीहुल्लाह यानं तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषेदत तालिबानचं आता कुणाही सोबत वैर राहिलेलं नाही. आम्ही सर्वांना माफ केलं आहे आणि महिलांना शरिया कायद्याअंतर्गत सर्व अधिकार दिले जातील. त्यांना काम करण्याचीही मुभा राहिल, असं आश्वासन दिलं होतं. 5 / 10 अलकायदा सारख्या दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानात वाढवलं जाणार नाही याची तालिबानकडून ग्वाही दिली जाणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर जबीहुल्लाह यानं अफगाणिस्तानही देवभूमी असून इथं दहशतवादाला आश्रय दिला जाणार नाही असं वारंवार आम्ही सांगत आलो आहोत, असं म्हटलं आहे. 6 / 10 'जेव्हा अमेरिकेला लादेनचा त्रास वाटू लागला. त्यावेळी लादेन अफगाणिस्तानात होता. पण ९/११ हल्ल्यात लादेनचा हात होता याचा कोणताही पुरावा नाही आणि अफगाणिस्तानच्या भूमीचा यापुढे दहशतवादासाठी वापर होणार नाही याची ग्वाही आम्ही दिली आहे', असं जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाला. 7 / 10 यासोबतच महिलांचा आम्ही सन्मान करतो. त्या आमच्या भगिनी आहेत आणि त्यांना घाबरुन जाण्याची कोणतीही गरज नाही. तालिबाननं देशासाठी लढा दिला आहे. महिलांना उलट तालिबानी शूरांचा अभिमान वाटला पाहिजे, असंही मुजाहिद म्हणाला. 8 / 10 'अफगाणिस्तानातील भूमिपूत्रांना देश सोडून जाण्याची कोणतीही गरज नाही. त्यांना याआधी केलेल्या सर्व चूका आम्ही माफ केल्या आहेत. आम्हाला देशात सुशिक्षित आणि युवा नागरिकांची गरज आहे. तरीही त्यांना देशात राहायचं नसेल तर तो त्यांचा निर्णय आहे', असंही मुजाहिद म्हणाला. 9 / 10 तालिबाननं खतरनाक दहशतवादी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर (Mullah Abdul Qayyum Zakir) याला अफगाणिस्तानाचा अंतरिम संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. कतारच्या अल जजीरा वृत्तसंस्थेनं तालिबानी सुत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. 10 / 10 मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर तालिबानचा कमांडर राहिलेला आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार अमेरिकन सैन्यानं मुल्ला अब्दुल याला २००१ साली अटक केली होती. त्यानंतर २००७ पर्यंत त्याला ग्वांतनामे बे या अमेरिकेचं शासन असलेल्या टॉप सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आणखी वाचा