शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात IHU व्हेरिएंटची दहशत; नव्या व्हेरिएंटवर WHO नं केले भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 1:06 PM

1 / 10
संपूर्ण जगावर सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची दहशत पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने संक्रमित करत असल्याने चिंता वाढली आहे.
2 / 10
ओमायक्रॉनचा धोका टळत नाही तोवर आता कोरोनाच्या IHU नावाच्या व्हेरिएंटनं धडक दिली आहे. हा व्हेरिएंट नोव्हेंबरमध्ये फ्रान्समध्ये आढळला होता. याठिकाणी IHU व्हेरिएंटने संक्रमित १२ रुग्णांची ओळख पटली होती. WHO ने फ्रान्समध्ये सापडलेल्या या नव्या व्हेरिएंटला मोठा धोका मानला नाही.
3 / 10
मात्र कोविड रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवून असलेल्या WHO अधिकारी आब्दी महमूद यांनी मंगळवारी जेनेवा इथं पत्रकार परिषद घेत म्हटलं की, कोरोनाचा IHU हा व्हेरिएंट आमच्या रडारवर आहे. फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचे १२ रुग्ण आढळले तेव्हाच दक्षिण आफ्रिकेतही ओमायक्रॉन सापडला होता.
4 / 10
द मेडिटेरेनी इंफेक्शन यूनिवर्सिटी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट(IHU) च्या संशोधकांनी वैज्ञानिक डिडायर राउल्ट यांच्या नेतृत्वात नवीन IHU B.1.640.2 व्हेरिएंटचा शोध घेतला. महामारीच्या सुरुवातीच्या काळात राउल्ट यांनी हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनसह उपचाराची शिफारस केल्याने वाद निर्माण झाला होता.
5 / 10
रिपोर्टनुसार, या नव्या व्हेरिएंटने संक्रमित पहिला रुग्ण हा लसीकरण झालेला होता. हा व्यक्ती अलीकडेच कॅमरुनहून फ्रान्सला परतला होता. डिसेंबर अखेरीस Medirix सर्व्हरवर प्रकाशित एका रिसर्च पेपरमध्ये IHU संशोधकांमध्ये असामान्य म्युटेशनवर लक्ष केंद्रीत केले होते.
6 / 10
या पीयर रिव्यू आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, IHU व्हेरिएंटच्या केवळ १२ रुग्णांच्या आधारे त्याच्या वायरोलॉजिकल, एपिडेमायोलॉजिकल आणि क्लीनिकल फिचरबद्दल काहीही अंदाज लावणं घाईचं ठरेल. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित रुग्णाला एक दिवसाआधीच श्वासाशी निगडीत सौम्य लक्षण जाणवली होती.
7 / 10
सध्या हा व्हेरिएंट फ्रान्सच्या सीमेतून बाहेर अन्य देशात पसरलाय की नाही? याबाबत काही पुरावे नाहीत. पण काही अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, हा व्हेरिएंट यापूर्वीच यूकेच्या सीमेत दाखल झालेला आहे. WHO या व्हेरिएंटवरही लक्ष ठेवून आहे.
8 / 10
WHO अनेक प्रकारच्या व्हेरिएंटचा आढावा घेते त्यानंतर तज्ज्ञांकडून व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न यादीत समाविष्ट करते. डेल्टा, डेल्टा प्लस आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत आहेत. तर सध्या IHU व्हेरिएंटचा तपास सुरु आहे.
9 / 10
देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
10 / 10
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २१३५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्रात ६५३ तर दिल्लीमध्ये ४६४ रुग्ण आढळून आले आहेत. तर २१३५ रुग्णांपैकी ८२८ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना