शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covid Variant Omicron: द. आफ्रिकेत लॉकडाउन! भारतातही नियम कडक; 9 पॉइंट्समध्ये जाणून घ्या, ओमायक्रॉनची जगातील दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 11:46 AM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने सध्या संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. याचा पहिला रुग्ण निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. पण, आता तो जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या एकाच व्हेरिअंटने पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण केली आहे. जाणून घेऊया, ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भातील महत्वाचे अपडेट्स...
2 / 10
24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा पहिला रुग्ण समोर आला. त्याच वेळी तेथील आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली होती, की त्यांच्या देशात कोरोनाचा एक नवा व्हेरिअंट समोर आला आहे आणि तो 30 हून अधिक वेळा म्युटेट झालेला आहे. याच बरोबर, इतर व्हेरिअंटच्या तुलनेत हा व्हेरिअंट अत्यंत वेगाने पसरण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
3 / 10
दक्षिण आफ्रिकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ओमायक्रॉन प्रकाराने तेथे कहर केला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की तेथे लेव्हल 1 स्टेजचा लॉकडाउनही जारी करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 11 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली असून आरोग्य व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसत आहे.
4 / 10
यावेळी, अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवास बंदी घातली आहे. डब्ल्यूएचओने या निर्णयाचे समर्थन केलेले नाही, परंतु अनेक देश व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलत आहेत. यांत, अमेरिका, कॅनडा, ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर, अशा अनेक देशांचा समावेश आहे.
5 / 10
WHO ने Omicron ला व्हेरिअंट ऑफ कंसर्न म्हटले आहे. आतापर्यंत, या प्रकाराबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिरिअंट लसीचा प्रभाव कमी करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कमी चाचण्या आणि लसीकरणाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
6 / 10
भारतासंदर्भात बोलायचे तर, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी केली आहे. या नव्या अॅडव्हायझरीनुसार, जोखीम असलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच कोविड चाचणी केली जाईल. तसेच, ते पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्यांनाही वेगळे केले जाईल आणि त्यांचे नमुने जीनोम सीक्वेंसिंगसाठी पाठवले जातील.
7 / 10
केंद्राने आपल्या स्तरावरतर काही सूचना दिल्या आहेतच, पण आता राज्य सरकारेही नियम कडक करताना दिसत आहेत. यातच, सिक्कीमने परदेशी नागरिकांना राज्यात येण्यास बंदी घातली आहे. असा निर्णय घेणारे ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे कुणीही परदेशी नागरिक 15 डिसेंबरपर्यंत सिक्कीममध्ये जाऊ शकणार नाही.
8 / 10
इतर राज्यांचा विचार करता, जोखीम असलेल्या देशांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. याशिवाय विमानतळावर कोविड चाचणीही अनिवार्य करण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली, तर तिला कोविड रुग्णालयात दाखल केले जाईल आणि त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा चाचणी होईल.
9 / 10
उत्तर प्रदेशातही प्रत्येक बस आणि रेल्वे स्थानकांवर टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर थर्मल स्कॅनिंगवरही भर दिला जात आहे. सर्व अधिकाऱ्यांना स्वतः विमानतळावर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रवाशाचे स्कॅनिंग व्यवस्थितपणे सुरू आहे, याची खात्री करण्यास सांगितले आहे.
10 / 10
देशभरात कडक नियम करण्यात आलेले असतानाही, ओमायक्रॉन व्हेरिएंट देशात पोहोचला आहे. कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या दोन रुग्णांची नोंदही झाली आहे. यांपैकी, एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून आली होती, तर दुसऱ्या व्यक्तीला ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. ती आरोग्य कर्मचारी आहे. दोघांची प्रकृती ठीक असून केवळ सौम्य ताप असल्याचे सांगण्यात येते. (सर्व फोटो सांकेतिक)
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस