PM मोदींबाबत पाक मंत्री हिना रब्बानी यांचं मोठं वक्तव्य, श्री श्री रविशंकर यांनी दिलं चोख प्रत्युत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 2:20 PM1 / 9गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पुढच्या २४ तासांत पाकिस्तानच्या पीएमओने शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत काश्मीबाबत गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आता पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनीही शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यापासून स्वतःला लांब ठेवले आहे. 2 / 9“आपला देश (पाकिस्तान) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'मित्र' म्हणून पाहत नाही. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांना पाकिस्तान एक मित्र म्हणून पाहत होता,' असे रब्बानी म्हणाल्या. 3 / 9हिना रब्बानी खार यांच्या या वक्तव्यावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. समस्या त्यांच्या बाजूने आहे हे पाकिस्तानला समजले पाहिजे. कारण भारताला इतर कोणत्याही शेजारी देशाशी कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणाले. 4 / 9पाकिस्तानच्या मंत्र्याचे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी भारतासोबत तीन युद्धे झाली आहेत आणि त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारी आली आहे, असे म्हटले होते. आम्ही पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की आम्हाला समस्या सोडवायची आहेत, असेही त्यांनी नमूद केले होते. 5 / 9“जेव्हा मी परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात गेले होते तेव्हा उत्तम सहकार्यासाठी आम्ही खूप मेहनत केली होती. सद्यस्थितीपेक्षा त्या काळात आम्ही चांगल्या स्थितीत होतो,” असे रब्बानी म्हणाल्या. दावोसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत साऊथ एशियावर आयोजित एका सत्रात त्या बोलत होत्या. 6 / 9या वर्षांमध्ये आम्ही जे काही केलं. त्यामुळे शत्रूत्व वाढलं आहे. आपण भौगोलिक स्थिती बदलू शकत नाही. ही दक्षिण आशियाची नाही, तर भारत-पाक समस्या आहे. मुत्सद्दी कौशल्याच्या समस्या या भारताकडून आहे, असंही त्या म्हणाल्या.7 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी चांगले नेते असतील, पण त्यांच्यात पाकिस्तानचा सहयोगी दिसत नाही. मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना आपण सहयोगीच्या रुपात पाहिलं असल्याचंही रब्बानी यांनी स्पष्ट केले. 8 / 9त्याच पॅनलचा भाग असलेल्या श्री श्री रविशंकर यांनी हिना रब्बानी यांना आरसा दाखवला. त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत समस्या पाकिस्तानकडून आहे हे त्यांना माहित असलं पाहिजे. कारण भारताला कोणत्याही शेजारी देशापासून कोणतीही समस्या नाही असं ते म्हणाले. 9 / 9“दोन्ही देशांमध्ये समान भाषा बोलली जाते. संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा हात पुढे केलाय. हिना रब्बानी यांच्या आरोपांना काही अर्थ नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications