भारतापेक्षा १५ वर्षे पुढे जाण्यासाठी मोठी डील करण्याच्या तयारीत पाकिस्तान; चीनची ४० लढाऊ विमाने खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:31 IST
1 / 7पाकिस्तानमधून भारतासाठी चिंताजनक बातमी येत आहे. भारतावर मात करण्यासाठी पाकिस्तानी हवाई दल चीनच्या अत्याधुनिक विमानांची खरेदी करण्याची शक्यता आहे. या लढाऊ विमानांमुळे पाकिस्तान एकाच डीलमध्ये १५-२० वर्षे पुढे जाणार असल्याचा दावा पाकिस्तानी हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला आहे. पुढची १४-१५ वर्षे भारताकडे असे विमान नसेल असा दावा त्यांनी केला आहे. 2 / 7पाकिस्तानकडे अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली होती, तेव्हा भारताच्या जुन्याच विमानांनी या अमेरिकी विमानांना धूळ चारली होती. यावरून पाकिस्तानी हवाई दलाची नाचक्की झाली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी हवाई दल भारतापेक्षा जास्त आपली ताकद वाढविण्याची तयारी करत आहे.3 / 7पाकिस्तानचे हवाई दल चीनकडून J-35A ही अत्याधुनिक पिढीची ४० लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यामुळे भारतीय उपखंडातील क्षेत्रिय शक्तींच्या संतुलनावर फरक पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे रिटायर्ड एअर कमांडर जिया उल हक शमशी यांनी ही डील झाल्यास भारतापेक्षा कित्येक पटीने पाकिस्तानची ताकद वाढणार असल्याचा दावा केला आहे. 4 / 7पाकिस्तानी मीडियानुसार हवाई दलाचे पायलट हे चीनमध्ये या विमानांचे प्रशिक्षण घेत आहेत. चीनकडे दोन स्टील्थ फायटर विमाने आहेत. यापैकी माइटी ड्रॅगन J-20 हे फक्त चिनी सैन्यासाठी तर J-35A दुसऱ्या देशांना विकण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. पाकिस्तानकडे चीनची आधीपासूनच दोन प्रकारची लढाऊ विमाने आहेत. 5 / 7शेनयांग एयरक्राफ्ट कॉर्पोरेशनने या लढाऊ विमानाला तयार केले आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानने चीनकडून शस्त्रास्त्रे खरेदी केली होती. ती निकृष्ट निघाल्याची वृत्ते येत होती. यावेळी चीनने पाकिस्तानला बकरा बनविल्याचे बोलले जात होते. 6 / 7पाकिस्तानी हवाई दल या नव्या लढाऊ विमानांचा वापर अमेरिकेचे एफ १६ आणि फ्रांसच्या मिराज ५ विमानांना बदलण्यासाठी करणार आहे. चीनचे J-35A हे लढाऊ विमान अमेरिकेच्या F-35B आणि F-35C यांना टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.7 / 7भारताकडे सध्या सुखोई 30MKI आणि राफेल सारखे ४.५ व्या पिढीची लढाऊ विमाने आहेत. आधीच भारतासमोर चीनचे आव्हान आहे, त्यात पाकिस्तानलाही चीनची ताकद मिळाली तर भारताला पाचव्या पिढीची विमाने घ्यावी लागणार आहेत.