शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुर्ची धोक्यात, तरीही इम्रान खान यांचा झेलेन्स्कींना सल्ला; म्हणे, "पाकिस्तानसारखा नि:पक्षपाती देश..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:20 PM

1 / 9
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या खुर्चीवर टांगती तलवार आहे. त्यांना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधी पक्ष आणि त्यांच्या पक्षातील काही लोकांनी पूर्ण तयारी केली आहे.
2 / 9
नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला असून, त्यावर ३१ मार्च रोजी चर्चा सुरू होणार आहे. राजकीय गोंधळादरम्यान इम्रान खान यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Ukraine Volodymyr Zelensky) यांच्याशी चर्चा केली आहे.
3 / 9
पाकिस्तानसारखे नि:पक्षपाती देश रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असं इम्रान खान झेलेन्स्की यांना म्हणाले. झेलेन्स्की यांनी ट्वीट करत इम्रान खान यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याची माहितीही दिली.
4 / 9
इम्रान खान आणि झेलेन्स्की यांच्यात मंगळवारी फोनवर चर्चा झाली. या संभाषणात इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या बाजूचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही देशांनी (रशिया-युक्रेन) तातडीने तणाव संपवण्याची आणि मतभेद राजनैतिक मार्गाने सोडवण्याची गरज असल्याचं सांगितलं.
5 / 9
दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) निवेदन जारी करण्यात आले. 'पाकिस्तानसारखे नि:पक्षपाती देश मतभेद दूर करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न मजबूत करण्यास सहाय्यक भूमिका बजावण्याच्या आणि एक राजनैतिक तोडगा काढण्याच्या स्थितीत आहे,' असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलं.
6 / 9
'युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. तसंच तणाव तात्काळ संपण्यासाठी आणि चर्चा, मुत्सद्देगिरीद्वारे संघर्ष संपवण्यावर भर दिला,' असंही निवेदनाद्वारे सांगण्यात आलं. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे विकसनशील देशांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचंही सांगण्यात आलं.
7 / 9
त्यांनी युक्रेनमधील नागरिकांसाठी मानवतावादी मदतीच्या महत्त्वावर भर दिला आणि पाकिस्तानकडून युक्रेनला पाठवण्यात आलेल्या मानवतावादी मदतीबद्दल झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगण्यात आलं. युक्रेनमध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी दोन C-130 विमानं पाठवल्याचंही त्यांनी झेलेन्स्की यांना सांगितलं.
8 / 9
ओआयसीच्या बैठकीत सदस्य देशांनी युक्रेनमध्ये उद्भ्वलेल्या सुरक्षा आणि मानवीय स्थितीवर चिंता व्यक्त केली, असंही इम्रान खान यांनी झेलेन्स्कींना सांगितलं. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
9 / 9
'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर चर्चा केली. मी त्यांना रशियाविरोधात आम्ही करत असलेल्या संघर्षाची माहिती दिली. युक्रेनच्या लोकांना शांतता हवी आहे. कोणत्याही अटीशिवाय याला आमचं प्राधान्य आहे,' असं झेलेन्स्क्री यांनी ट्वीट करत म्हटलं.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया