शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केला सर्जिकल स्ट्राईक; ८ तालिबानी ठार, संघर्ष पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 4:18 PM

1 / 9
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले आहे. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात ८ तालिबानी ठार झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तानने दोन दहशतवादी तळांवर हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
2 / 9
पाककडून अफगाणिस्तानातील दोन प्रांतांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खोस्त आणि पक्तिता प्रांतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला आहे
3 / 9
खुरासान मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, पक्तिता येथील सर्जिकल स्ट्राईकमध्ये तालिबानी कमांडर अब्दुल्ला शाहच्या लपून बसलेल्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले आहे. शाह ठार झाला की नाही याची पुष्टी झाली नसली तरी पाकिस्तानी लष्कराच्या या हवाई हल्ल्यात शाहाचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
4 / 9
७ तालिबानी दहशतवादी मारले गेले, खुरासानच्या म्हणण्यानुसार, हे मारले गेलेले तालिबान दहशतवादी हाफिज गुलबहादर गटाचे आहेत ज्यांचा पाकिस्तानमधील वझिरीस्तानमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. १६ मार्चच्या पहाटे, या तालिबानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या बेस कॅम्पवर हल्ला केला आणि स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने पोस्टला धडक दिली. या भीषण स्फोटात ५ जवानांचा जागीच मृत्यू झाला होता.
5 / 9
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखा ISPR ने सांगितले होते की, १६ मार्चच्या पहाटे दहशतवाद्यांच्या एका गटाने वझिरीस्तानमधील एका चौकीवर हल्ला केला होता. लष्कराने हल्ल्याचा पहिला प्रयत्न हाणून पाडला, त्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले, या स्फोटात ५ जवान शहीद झाले. यानंतर लष्कराने प्रत्युत्तर देत ६ दहशतवाद्यांना ठार केले होते.
6 / 9
पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील टीटीपी या दहशतवादी संघटनेवर कथित हवाई हल्ला केला. आता यावरून दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हल्ल्यात कमांडर पाकिस्तानात असल्याचा दावा दहशतवादी संघटनेने केला आहे. त्याने रिलीज केलेला व्हिडिओ आणि फोटोही प्रसिद्ध केला आहे.
7 / 9
या हल्ल्याप्रकरणी दोन्ही देशांकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु अधिकृत निवेदनात टीटीपीने अफगाणिस्तानातील खोस्त आणि पक्तिका प्रांतात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला.
8 / 9
या घटनेनंतर आज सकाळी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दोन्ही देशांच्या सुरक्षा जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. पाकिस्तानने केलेल्या कथित कारवाईमुळे अफगाणिस्तान आणि तालिबानचे सुरक्षा जवान चांगलेच संतापले असल्याचं चित्र आहे.
9 / 9
आगामी काळात दोन्ही देशांमधील हिंसक चकमकी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दहशतवादी संघटनांकडून पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर आणखी हल्ले होऊ शकतात.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान