शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pakistan Imran Khan : पाकिस्तानी रुपयाची बिकट स्थिती; इम्रान खान यांच्या कारकिर्दीत झाली खराब अवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 9:27 AM

1 / 12
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. देशावरील कर्ज कमी करण्याचं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या कारकिर्दीत मात्र देशावरील कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असतानाच दुसरीकडे आता पाकिस्तानी रुपयाची स्थितीही बिकट झाली आहे.
2 / 12
पाकिस्तानी रुपयाची अवस्था सध्या बिकट आहे. २०२१ मध्ये पाकिस्तानी रुपया जगातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनापैकी एक आहे. २०२१ च्या सुरुवातीपासून पाकिस्तानी रुपयामध्ये १२ टक्क्यांहून अधिक आणि मे महिन्याच्या मध्यात १५२.५० डॉलर्सच्या नीचांकी पातळीवर १७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
3 / 12
२०२१ च्या अखेरीस पाकिस्तान सरकार अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा आयएमएफकडे गेल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांमधून समोर आली आहे. तसंच रुपयाचं मूल्यही स्थिर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं काही उपाय केले असल्याचंही पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉननं म्हटलं आहे.
4 / 12
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) अमेरिकन चलनाचा प्रवाह रोखण्यासाठी आणि त्याची मागणी कमी करण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर आणि तस्करांवर सातत्याने कारवाई करत आहे.
5 / 12
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विद्यमान सरकारच्या काळात गेल्या तीन वर्ष आणि चार महिन्यांत पाकिस्तानी रुपयाचं मूल्य मोठ्या प्रमाणात घसरलं आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ३०.५ टक्क्यांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे.
6 / 12
पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ऑगस्ट २०१८ मध्ये डॉलरच्या तुलनेत १२३ रुपयांवरून डिसेंबर २०२१ मध्ये १७७ रुपयांवर घसरले आहे. गेल्या ४० महिन्यांत ही ३०.५ टक्क्यांची घट आहे. यामुळे देशाच्या इतिहासातील चलनाचे आतापर्यंतचे उच्च अवमूल्यन झाले आहे.
7 / 12
यापूर्वी जेव्हा पश्चिमी पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी रुपयाचं अवमूल्यन झालं होतं. त्यावेळी पाकिस्तानी रुपयाची किंमत ५८ टक्क्यांची घसरुन ४.८ रुपयांवरुन ११.१ रुपये इतकी झाली होती.
8 / 12
देशाचे आर्थिक वर्ष भौतिक धोरण आणि विनिमय दर धोरणांच्या अधीन झाले असल्याने आर्थिक धोरण तयार करणे पूर्णपणे कोलमडले आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या चलनाच्या ढासळत्या स्थितीबाबत बोलताना पाकिस्तानचे माजी आर्थिक सल्लागार डॉ. अशफाक हसन खान यांनी दिली. पब्लिक डेब्ट, डेब्ट सर्व्हिस आदींमुळे परिस्थिती बिकट झाली असल्याचेही ते म्हणाले.
9 / 12
सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. देश चालवण्यासाठी त्यांना अनेक देशांकडे कर्ज मागावं लागत आहेत. आर्थिक डबघाईतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं.
10 / 12
आपल्या बुडत्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पाकिस्ताननं सौदी अरेबियाकडून मदत मागितली होती. ही त्यापैकीच असलेली रक्कम आहे. परंतु सौदी अरेबियानंदेखील पाकिस्तानला ४ टक्के व्याजानं ही रक्कम दिली.
11 / 12
इम्रान खान यांच्या हाती पंतप्रधानपदाची धुरा गेल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या स्टेट बँकेनं जी आकडेवारी सादर केली, त्यानंतर संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.
12 / 12
चर्चेनंतर सौदी अरेबियानं पाकिस्तानला ४.२ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देण्यासाठी होकार दिला होता. त्यापैकी ३ अब्ज डॉलर्सची रक्कम पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेत स्थानांतरीत करण्यात येणार होती.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान