शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: रशियाकडून भयानक संहार, युक्रेनमधील मारियोपोल शहर बेचिराख, ५ हजार नागरिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:22 AM

1 / 7
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज ३४ वा दिवस आहे. या काळात रशियाकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस होत आहे. रशियन आक्रमणाचा सर्वाधिक फटका मारियोपोल शहराला बसला असून, रशियाच्या हल्ल्यात हे संपूर्ण शहरच बेचिराख झाले आहे. तसेच येथे तब्बल पाच हजार नागरिकही बळी पडले आहेत. हजारो लोक जखमी झाले आहेत. तसेच हजारोंच्या संख्येने बेघर झाले आहेत. पार्क आणि शाळांच्या आवारात लोकांना दफन केले जात आहे. रशियाच्या हल्ल्यात ९० टक्के इमारतींचे नुकसान झाले आहे. तर ४० टक्के इमारती ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत.
2 / 7
काही दिवसांपूर्वी याच मारियोपोल शहरातून लोकांना बाहेर पडण्यासाठी रशियाने युद्धविराम जाहीर केला होता. युद्धादरम्यान, शहराबाहेर जाण्यासाठी सेफ पॅसेज दिला जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र त्याच्या उलट घडले. रशियन सैनिकांनी रस्त्यावर उतरून नागरिकांवर बेछूट हल्ले केले. रशियन विमानांच्या एअरस्ट्राईकमुळे सगळीकडे जळत्या घरांच्या धुराचे साम्राज्य पसरले आहे.
3 / 7
मारियोपोलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे की मृतदेहांना दफनभूमीत नेणेही कठीण बनले आहे. त्यामुळे पार्क आणि शाळांच्या मैदानात मृतदेह दफन केले जात आहेत. तसेच मारियोपोलमधील संपर्काची यंत्रणाही ठप्प झाली आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित होत आहे.
4 / 7
युद्धाच्या सुरुवातीला रशियाने किव्हला टार्गेट केले होते. केवळ सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा दावा रशियाने केला होता. मात्र नंतर रशियन सैनिकांनी लष्करी तळांसोबतच निवासी भागांनाही लक्ष्य केले. मात्र किव्ह खारकिव्हपेक्षा मारियोपोलमध्ये रशियाने अधिक विध्वंस घडवला.
5 / 7
मारियोपोलमध्ये रशियाने मारियोपोलला किव्हशी जोडणारे पूल उद्ध्वस्त केले. रशियन सैनिकांनी शहरात प्रवेश केल्यापासून मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. मारियोपोलच्या महापौरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आपल्या ५ हजार लोकांना गमावले आहे. एक हसतं खेळतं शहर नष्ट झालं आहे. येथील ९० टक्के इमारती नष्ट झाल्या आहेत.
6 / 7
रशियन आक्रमणाचा सामना करत असलेले युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्की यांनी हल्लीच सांगितले होते की, अतिरिक्त टँक आमि विमानांच्या मदतीशिवाय मारियोपोलला वाचवणे शक्य नाही. युक्रेन रशियाच्या क्षेपणास्त्रांना शॉटगन आणि मशीनगनच्या मदतीने मारू शकत नाही. त्यामुळे आम्ही आवश्यक हत्यारांसाठी खूप दिवसांपासून वाट पाहत आहोत.
7 / 7
रशियन लष्कराने येथील एका शाळेवरही एअर स्ट्राईक केली होती. या शाळेमध्ये ४०० लोकांनी आश्रय घेतला होता. गेल्या ३४ दिवसांत युक्रेनमधील अनेक शहरांची धुळधाण उडाली आहे. लोकांना अन्नपाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक तास रांगेत राहिल्यावर थोडसं भोजन मिळत आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय