शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: मुठभर सैन्य, जिद्दीने लढले! रशियन फौजा कीव्हमधून मागे हटल्या; युक्रेनच्या युद्धभूमीवर मोठी घडामोड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:01 AM

1 / 11
रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला आज ३३ दिवस उलटले आहे. दोन दिवसांत युक्रेन हाती येईल अशा अविर्भावात गेलेल्या पुतीन सेनेला ३३ दिवस झाले तरी साधे सीमेवरील खारकीव्ह ताब्यात घेताना नाकीनऊ आले होते. युक्रेनची राजधानी कीव्हतर त्यांच्यासाठी लांबचीच गोष्ट झाली आहे.
2 / 11
अवघे दोन लाख सैन्य घेऊन युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला जोरदार टक्कर दिली. पहिल्या दिवशी रशियाच्या जोरदार आक्रमणामुळे युक्रेन गळीतगात्र झाला होता. पहिल्याच दिवशी कीव्ह पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. रशियन फौजा कीव्हच्या वेशीवर धडकू लागल्य़ा होत्या. आकाशातून एकामागोमाग एक अशी मिसाईल इमारतींवर पडत होती.
3 / 11
झेलेन्स्कींनी मोठी युक्ती लढविली. अमेरिकेने त्यांना युक्रेन सोडण्यास सांगितले होते, त्यासाठी सर्व बंदोबस्त, ट्रूप्स पाठविण्याची तयारी केली होती. परंतू, पेशाने विनोदवीर असलेल्या झेलेन्स्की यांनी त्यास नकार देत कीव्हमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर गाड्या काय पाठवता, लढण्यासाठी शस्त्रे द्या असे म्हणत युक्रेनी जनतेलाही युद्धात उतरण्याचे आवाहन केले होते.
4 / 11
झेलेन्स्कींचा हा डाव अगदी योग्य ठरला आणि तिथेच रशियन फौजा फसल्या. खारकीव्हच्या ज्या भागावर रशियाने ताबा मिळविला होता, तो देखील चिवट प्रतिकारामुळे गमवावा लागला. कीव्ह पडले की युक्रेन ताब्यात येईल म्हणून रशियाने होती नव्हती ती भात्यातील शस्त्रास्त्रे आदळवली. खच्चीकरण करण्यासाठी हॉस्पिटल, घरांवर हल्ले करत माणसे मारली. परंतू, मुठभर मावळे बधले नाहीत.
5 / 11
यामुळे रशियाने आता आपला मोर्चा युक्रेनचे दोन तुकडे करण्याकडे वळविला आहे. युद्धाच्या आधी रशियाने जे दोन भाग स्वतंत्र झाल्याची घोषणा केली, त्यासाठी लष्करी बळ वापरण्याचे संकेत दिले आहेत. एवढे दिवस लढूनही युक्रेन ताब्यात येत नसल्याने युक्रेनचे दोन भाग करण्याची खेळी पुतीन खेळत आहेत.
6 / 11
रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची मुलाखत रोखली आहे. झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेपूर्वी अनेक रशियन माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत.
7 / 11
युक्रेन अण्वस्त्र आणि जैविक शस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रशियाने केला आहे. झेलेन्स्कीनी हे आरोप नाकारले. आमच्याकडे अण्वस्त्रे नाहीत. आमच्याकडे जैविक प्रयोगशाळा आणि रासायनिक शस्त्रे नाहीत. युक्रेनमध्ये या गोष्टी नाहीत., असे ते म्हणाले.
8 / 11
युक्रेनने युद्धाच्या काळात बेलारूसवर कारवाई केली आहे. ल्वीव्ह शहरातील बेलारूसचे दूतावास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
9 / 11
युक्रेनने दावा केला आहे की रशियन सैन्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 139 मुलांचा मृत्यू झाला आहे. तथापि, यूएनने आतापर्यंत केवळ 99 मुलांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. युक्रेनमधील 1119 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 1700 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
10 / 11
युक्रेनमधील 40 लाखांहून अधिक लोक युद्धामुळे निर्वासित झाले आहेत. UN च्या म्हणण्यानुसार 18 लाख लोक देशाबाहेर विस्थापित झाले आहेत आणि 25 लाख लोक देशात विस्थापित झाले आहेत.
11 / 11
युक्रेन युद्धात आतापर्यंत 1,351 रशियन सैनिकांनी आपला जीव गमावला असून त्यात 6 जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे रशियाने म्हटले आहे. तथापि, युक्रेनच्या म्हणण्यानुसार त्याने 6,600 रशियन सैन्य मारले आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन