russia vladimir putin says pm narendra modi and chinese president xi jinping are responsible leaders
“पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग जबाबदार नेते; भारत-चीन प्रश्न सोडवण्यास सक्षम”: पुतिन By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 12:21 PM1 / 12सेंट पीटर्सबर्ग: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (xi jinping) हे दोघेही खूप जबाबदार नेते आहेत. भारत आणि चीन यांच्यातील समस्या सोडविण्यासाठी ते सक्षम आहेत, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी म्हटले आहे. 2 / 12पुतिन यांनी भारतासह अमेरिका व युरोपीय देशांमधील वृत्तसंस्थांच्या संपादकांशी संवाद साधला, त्यामध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दोन्ही देशांमधील प्रश्न सोडविण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे बाह्य प्रादेशिक शक्तींनी या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप न करणे हे महत्त्वाचे आहे, असे पुतिन म्हणाले. 3 / 12भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वाड गटावर रशियाने टीका केली असून, एखाद्या देशाने अन्य देशांशी कितपत संबंध ठेवावे याच्याशी रशियाचा संबंध नाही, मात्र कोणाच्या तरी विरोधासाठी एखाद्याशी मैत्री करणे हा उद्देश नसावा, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.4 / 12चीनच्या वाढत्या कारवायांमुळे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा ‘क्वाड’ हा गट आकाराला आला आहे. रशिया आणि भारत हे मित्रदेश असून, रशियाचे चीनबरोबरील संबंधही दृढ आहेत. मात्र, यामध्ये कोणताही विरोधाभास नसल्याचे सांगत पुतिन यांनी भारत-चीन यांच्यातील वादावर भाष्य केले. 5 / 12भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये काही समस्या आहे. मात्र, दोन शेजारी देशांमध्ये कायमच अशा पद्धतीचे वाद होत असतात. मात्र, मोदी आणि जिनपिंग या दोन्ही नेत्यांच्या विचारांची पद्धत मला माहीत आहे.6 / 12दोन्ही नेते खूप जबाबदार असून, परस्परांना खूप आदराने वागवतात. त्यामुळे, ते या समस्यांच्या तोडग्यापर्यंत येतील, असा विश्वास मला वाटतो. मात्र, या विभागाबाहेरील कोणत्या देशाने या समस्येमध्ये हस्तक्षेप करायला नको, असे पुतिन यांनी सांगितले.7 / 12रशियाची भारतासमवेत असलेली भागिदारी आणि रशिया आणि चीन यांच्यातील संबंध यामध्ये कोणतीह विसंगती नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध विश्वासावर आधारित आहेत. या संबंधांमध्ये अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि उच्चतंत्रज्ञानाचा समावेश आहे.8 / 12अद्ययावत शस्त्रास्त्रे विकसित करणे आणि उत्पादन करण्याच्या दृष्टीने रशिया केवळ भारताबरोबर भागीदारी करत आहे. मात्र, दोन्ही देशांमधील संबंध केवळ या क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर बहुस्तरीय आहे. 9 / 12अमेरिका चलनाचा वापर राजकीय अस्त्रासारखा करत आहे, असा आरोप पुतिन यांनी केला. क्वाड गटाबाबत आणि त्यामधील भारताच्या सहभागाबद्दल रशियाचे काय मत आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असता पुतिन यांनी वरील मत व्यक्त केले. 10 / 12रशियन बनावटीच्या स्पुटनिक-व्ही लशींचे उत्पादन करण्यासाठी भारतीय कंपन्या तयार आहेत. लशींचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी तयार असणारा रशिया हा एकमेव देश आहे, असा दावा पुतिन यांनी केला आहे. 11 / 12आतापर्यंत ६६ देशांना लशी विकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भारतामध्ये डॉ. रेड्डीज यांना एप्रिलमध्ये स्पुटनिक-व्ही लशींच्या उत्पादनासाठी परवानगी मिळाली. 12 / 12आता सीरमलाही परवानगी मिळाली आहे. याशिवाय, पॅनाशिया बायोटेक या कंपनीनेही भारतामध्ये उत्पादन सुरू केले आहेत, या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे विधान केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications