शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sri Lanka Crisis: सोन्याची लंका महागाईत कोणी जाळली, व्हिलन कोण?; चार भावांनी केले कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 2:48 PM

1 / 13
भारताचा शेजारी देश आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीलंकेत मोठा हाहाकार उडाला आहे. महागाई एवढी वाढली आहे की, लोकांनी गुरुवारी रात्री श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करताच जमाव हिंसक झाला. एवढी भीषण अवस्था कशी आली, सोन्याची लंका म्हणता म्हणता ती एवढी कंगाल कशी झाली, कोणी या छोट्याशा देशाची एवढी भयाण अवस्था केली
2 / 13
श्रीलंकेतील लोक राजेपाक्षे सरकारविरोधात नाराज आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेवर याच कुटुंबाचे राज्य आहे. राजेपाक्षे कुटंबाचे चार भाऊ मिळून राज्य करत आहेत. त्यांच्यावर निरंकुश शासक असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. या चार भावांनीच देशाची अर्थव्यवस्था कंगाल केल्याचे म्हटले जात आहे.
3 / 13
राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेच्या प्रादेशिक राजकारणात सुरुवात केलेली. 2005 मध्ये महिंदा राजपक्षे यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. यानंतर राजपक्षे कुटुंबातील लोकांनीच सत्तेतील महत्वाची पदे काबीज केली. धाकटे भाऊ आणि तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली. बासिल राजपक्षे यांची राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
4 / 13
2010 मध्ये महिंदा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी त्यांनी मोठा भाऊ चमल राजपक्षे यांनाही सत्तेत सहभागी केले. वेळ अशी आली की देशाच्या बजेटच्या 70 टक्के भागावर राजपक्षे कुटुंब थेट नियंत्रण ठेवते, असे आरोप झाले.
5 / 13
परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महिंदा राजपक्षे यांचा २०१५ च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा सत्ता मिळविली. गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती झाले. महिंदा राजपक्षे पंतप्रधान झाले. बासिल राजपक्षे अर्थमंत्री आहेत तर चमल राजपक्षे कृषि मंत्री. एवढेच नाही तर महिंदा यांचा मुलगा नमल युवा आणि क्रीडा मंत्री आहे. एकूण ७ लोक सत्तेत आहेत.
6 / 13
जो कोणी मंत्री राजपाक्षे कुटुंबाविरोधात जाऊन त्यांच्या नितीविरोधात बोलेल त्याला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागतो. श्रीलंकेतील आणीबाणी आणि परकीय चलनाच्या संकटामुळे मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखानेही आपले पद सोडले.
7 / 13
श्रीलंकेत सध्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. एक किलो तांदळासाठी लोकांना पाचशे श्रीलंकन ​​रुपये मोजावे लागतात आणि साखरेच्या बाबतीतही तेच आहे. फळे आणि भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. भाज्यांचे भाव हजारो रुपयांवर पोहोचले आहेत.
8 / 13
ब्रेड इतका महागला आहे की गरीब लोकांना तो विकत घेता येत नाही आणि त्यांना उपाशी राहावे लागत आहे. श्रीलंकेतील अनेक लोक देश सोडून भारतात येत आहेत. अन्नधान्याच्या गंभीर संकटाला सरकारचे ढिसाळ धोरण कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
9 / 13
एप्रिल २०२१ मध्ये, श्रीलंका सरकारने देशातील सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली. शेतीतील या अचानक बदलामुळे उत्पादन पूर्णपणे घटले आहे. फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याचे उत्पादन पूर्णपणे कमी झाले आणि अन्नधान्यांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे ही भीषण परिस्थिती आली आहे.
10 / 13
श्रीलंकेच्या वीज प्रकल्पांनाही पुरेसे इंधन मिळत नाही. श्रीलंकेतील लोकांना जवळपास 13 तास अंधारात घालवावे लागतात. अनेक वीज केंद्रे इंधनाअभावी बंद पडली आहेत. पेट्रोल, डिझेलही उपलब्ध नसल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत.
11 / 13
देशात अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय वस्तूंचाही मोठा तुटवडा आहे, त्यामुळे अनेक रुग्णालयांनी शस्त्रक्रिया थांबवल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेतही अनेक आजारी लोकांच्या मृत्यूचा धोका निर्माण झाला आहे.
12 / 13
श्रीलंकेची परकीय चलनाची गंगाजळी रिकामी झाली असून त्यावर चीन, जपान, भारत आदी देशांचे कर्जही वाढत आहे. जानेवारीपासून श्रीलंकेच्या परकीय चलनाच्या साठ्यात 70% घट झाली आहे. त्यामुळे आयात थांबली आहे. यामुळे परदेशातून देखील अत्यावश्यक वस्तू मागवू शकत नाहीय.
13 / 13
धान्यासाठी लोक भटकत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनाही पुरवठा होत नसल्याने अर्ध पोटीच रहावे लागत आहे. श्रीलंकेतील या परिस्थितीसाठी कोरोना महामारी हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. पर्यटनावर अवलंबून असलेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInflationमहागाई