शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दूध पावडर ७९० रुपये, साखर २९० रुपये किलो, श्रीलंकेत स्थिती बिकट; भारतासमोर वेगळंच संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:38 AM

1 / 9
Economic crisis in Sri Lanka: श्रीलंकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस (Economic crisis in Sri Lanka) अधिक बिकट होत चालली आहे. देशात अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे लोकांना तासनतास रांगेत उभं राहून अन्नधान्य विकत घ्यावं लागत आहे.
2 / 9
श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि अत्यावश्यक वस्तूंचं संकट इतक्या प्रमाणात वाढलंय की आता त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. मंगळवारी जवळपास १६ श्रीलंकन नागरिक भारतात दाखल झाले. तसंच ते निर्वासित म्हणून भारतात आले आहेत. दरम्यान, मोठ्या प्रमाणात श्रीलंकन निर्वासित भारतात येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
3 / 9
श्रीलंकेच्या निर्वासितांचे दोन गट मंगळवारी भारतीय किनारपट्टीवर पोहोचले. यापैकी सहा जणांच्या गटाला भारतीय तटरक्षक दलानं रामेश्वरमच्या किनाऱ्याजवळ वाचवलं. अरिचल मुनईपासून दूर असलेल्या चौथ्या बेटावर ते अडकले होते. हे सर्व लोक श्रीलंकेतील उत्तर जाफना किंवा मन्नार भागातून आले आहेत.
4 / 9
मंगळवारी भारतात दाखल झालेल्या एका गटात तीन लहान मुलांचाही समावेश होता. हे लोक रामेश्वर जवळ एका बेटावर अडकले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढलं. १० जणांचा दुसरा गट रात्री उशीरा भारतात पोहोचला.
5 / 9
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, तामिळनाडू पोलिसांनी सांगितलं की, श्रीलंकेत प्रचंड बेरोजगारी आणि अन्न संकटामुळे श्रीलंकन ​​शरणार्थी भारतात येऊ लागले आहेत. श्रीलंकेचा उत्तरेकडील भाग हा तामिळबहुल प्रदेश आहे. तामिळनाडू इंटेलिजन्सच्या मते ही फक्त सुरुवात आहे.
6 / 9
आता तेथून बरेच लोक येणं अपेक्षित आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, सुमारे २ हजार श्रीलंकन ​निर्वासित लवकरच भारतात येणार आहेत. हे लोक भारतात येण्याची वाट पाहत आहेत.
7 / 9
श्रीलंकेच्या सहा सदस्यांच्या गटात एक दांपत्यही होतं. आपल्या चार महिन्यांच्या मुलाला घेऊन ते समुद्रमार्गे आपला जीव धोक्यात घालून भारतात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने त्यांना सुखरुप वाचवलं. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत अन्नधान्याची कमतरता झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
8 / 9
मच्छीमारांना भारतीय समुद्र हद्दीत दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच भारतात येण्यासाठी त्यानं नाविकालाही ३ लाख रुपये दिले असून अनेक कुटुंबीय भारतात येण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं
9 / 9
श्रीलंकेत तांदुळ ५०० श्रीलंकन रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर ४९० ग्राम दुधाच्या पावडरसाठी ७९० रुपये मोजावे लागत आहेत. एक किलो साखरेची किंमतही २९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्या प्रमाणे १९८९ च्या गृहयुद्धाच्या काळात स्थलांतर झालं होतं, तशीच शक्यता असल्याची चिंता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारत