शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच रात्री दोन देशांवर सर्जिकल स्ट्राईक; हे फक्त मोसादच करू शकते, जगाला संशय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:39 AM

1 / 8
आज पुन्हा एकदा इस्रायलने जगाला आपल्या ताकदीचा अंदाज दिला आहे. एकाच रात्रीत दोन देशांमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून हिजबुल्लाह आणि हमास या दोन दहशतवादी संघटनांना धडा शिकविला आहे. इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या हमासच्या प्रमुखाचीच हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकीकडे जगाने पुन्हा एकदा छोट्याशा देशाची ताकद पाहिली आहे.
2 / 8
इस्रायल... एकाचवेळी अनेक देशांशी युद्ध करणारा आणि जिंकणारा देश अशी या देशाची ख्याती आहे. त्यांची मोसाद हे त्यांचे ब्रम्हास्त्र. जगातील नावाजलेली गुप्तचर यंत्रणा. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही एजन्सी एवढी प्रबळ की शत्रू देशांना अनेकदा तिने पाणी पाजलेले आहे.
3 / 8
या मोसादने हमासचा खात्मा करताना हमास प्रमुख इस्माइल हानियाच्या तीन मुलांना एप्रिलमध्येच संपविले. हानियाच्या चार नातवांचीही हत्या केली. त्यानंतर गेल्याच महिन्यात हानियाच्या बहीणीची हत्या केली. आता हानियाची हत्या झाली आहे. ही हत्या मोसादनेच केल्याचा आरोप इराण आणि हमास करत आहे.
4 / 8
इराणसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. हानिया हा इराणमध्ये नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्‍किआन यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी आला होता. तो हमासचे राजनैतिक नेतृत्व करत होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये इस्रायलने गाझातील हानियाचे घरही उडवून दिले होते. आता हानियाची हत्याही मोसादनेच केली असावी असा संशय जगाला आहे.
5 / 8
एकाच रात्री इस्रायलने दोन ऑपरेशन राबविली. इस्रायलने लेबनानच्या राजधानी बेरूतवर हल्ला केल्याची बातमी येत नाही तोच हमास प्रमुखाला मारल्याची बातमी येऊन धडकली होती. जदल शम्समध्ये हिजबुल्लाने केलेल्या हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू झाला होता. यामुळे चिडलेल्या इस्रायलने थेट लेबनानच्या बेरूतवर क्षेपणास्त्रे डागली. यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर फउद शुकर मारला गेला होता.
6 / 8
हमास प्रमुख इस्माइल हानिया हा कधी कतर तर कधी इराण असा लपत होता. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी शपथ घेतली. या कार्यक्रमात तो आला होता. इथूनच मोसादने त्याच्यावर पाळत ठेवली होती, असे सांगितले जात आहे. हानियाने मंगळवारीच इराणचे सुप्रिम लीडर इमाम सैयद अली खामेनेई यांची भेट घेतली होती.
7 / 8
इस्रायलने आपले दोन शत्रू मारले असले तरी इराण खवळलेला आहे. त्यांच्या पाहुण्याला त्यांच्याच देशात मोसादने संपविले आहे. यामुळे हे युद्ध इथेच संपणार नसून हमासने याचा बदला घेण्याची घोषणा केली आहे.
8 / 8
हानियाच्या हत्येनंतर इस्रायलची प्रतिक्रिया आली आहे. या जगातून ही घाण स्वच्छ करण्याचा हाच योग्य मार्ग आहे. आता कोणतीही काल्पनिक शांतता किंवा आत्मसमर्पण करार होणार नाही. अशा लोकांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे ट्विट इस्रायलचे हेरिटेज मंत्री अमिहाई एलियाहू यांनी केले आहे.
टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराण