1 / 8अफगाणिस्तानात तालिबानकडून सत्तास्थापनेसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. सरकार स्थापनेसाठी तालिबानी नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. यातच तालिबानचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी तालिबाननं सत्ता स्थापनेसाठी विशेष तारीख निश्चित केली आहे. 2 / 8सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानकडून येत्या ११ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता. 3 / 8अमेरिकेवरील ९/११ हल्ला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो. याच हल्ल्याला येत्या ११ सप्टेंबर रोजी २० वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेला खिजवण्यासाठी तालिबानकडून याच दिवशी सरकार स्थापनेची घोषणा करुन कडक इशारा देण्याचा तालिबानी नेत्यांचा मानस आहे. 4 / 8तालिबानी सरकारचं नेतृत्त्व मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या हाती सोपवण्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे. 5 / 8 मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याच्या हातात सध्या तालिबानची सर्वात शक्तीशाली संघटना म्हणून ओळख असलेल्या रहबरी शूराची कमान आहे. याच संघटनेकडून महत्त्वाचे निर्णय आजवर घेण्यात आले आहेत. याशिवाय मुल्ला हसन याला तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याचा निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं. 6 / 8अमेरिकेवर ९/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यानं ठार केलं होतं. ओसामा बिन लादेननं केलेल्या कृत्याचं समर्थन करण्यासाठी तालिबानकडून याच दिवसाचं औचित्य साधत तालिबानी सरकारची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 7 / 8स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी याची गृहमंत्रीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. तर तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर याचा मुलगा मुल्ला याकूब देशाच्या संरक्षण मंत्रीपदी विराजमान होणार आहे. 8 / 8याशिवाय तालिबानी नेता आणि प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याचं नाव सूचना मंत्री म्हणून घोषीत केलं जाण्याची शक्यता आहे. तर मुल्ला अमीर खान मुत्ताकी याला परराष्ट्र मंत्री म्हणून घोषीत केलं जाऊ शकतं.