शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Taliban Conflict: भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 9:57 AM

1 / 13
आताच्या घडीला तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे.
2 / 13
तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात पाय पसरत असून, काही जणांच्या मते देशातील ६० टक्के भूप्रदेश त्यांच्या अमलाखाली आला आहे. कंदाहारमध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय छायाचित्रकार दानिशची तालिबानने हत्या केली होती.
3 / 13
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अनेक मोठी शहरं ताब्यात घेतल्याने आता काबूलसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
4 / 13
तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून काही दिवसांमध्ये तालिबान राजधानीचं शहर काबूलही ताब्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कंदाहारवर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
5 / 13
तालिबानचे कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनला, भारताला तुम्ही मित्र मानता की शत्रू?, असे सवाल करण्यात आला. यावर, तुम्ही हे तुमच्या सरकारला विचारलं पाहिजे की ते तालिबानला मित्र मानतात की शत्रू.
6 / 13
जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्याविरोधात लढण्यासाठी बंदूका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टीकोनातूनच पाहू. मात्र भारताने अफगाणिस्तानमधील शांतता आणि भरभराटीसाठी काम केले त्याला आम्ही वैर भावना म्हणणार नाही. काय ते भारताने ठरवावे, अशी स्पष्ट भूमिका प्रवक्त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना मांडली आहे.
7 / 13
एएनआयशी बोलताना प्रवक्ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरोधात कारवाई करण्यासाठी केला जाणार नाही. ते शेजारी राष्ट्र असले तरी. तसेच कोणत्याही देशाचे दूतावास आणि तेथील कर्मचाऱ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवले जाणार नाही. हे आमचे वचन आहे, याबाबत आम्ही शब्द देतो, असेही ते म्हणाले.
8 / 13
पाकिस्तानचा आम्हांला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या गोष्टी चुकीच्या आहेत. हे केवळ राजकारण आहे. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी जे काही केले, त्यासाठी आम्ही भारताचे आभारी आहोत, असे प्रवक्त्यांनी सांगितले.
9 / 13
भारताची तालिबानशी चर्चा सुरु आहे का या प्रश्नावरही साहीनने उत्तर दिलं. “होय, आम्ही पण बातम्या ऐकल्या की भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत. मात्र याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही.
10 / 13
मात्र मी ठामपणे हे सांगू शकतो की काल झालेल्या एका बैठीला भारतीय अधिकारी आणि तालिबानी प्रतिनिधी उपस्थित होते, असे साहीन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आम्ही आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना काम करण्यास परवानगी देऊ, असेही तालिबानने स्पष्ट केले आहे.
11 / 13
दरम्यान, अफगाणिस्तानात आतापर्यंत हेरात या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कंदाहार या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १८ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत. आता अफगाणिस्तानच्या दोन -तृतीयांश भागावर त्यांचे नियंत्रण आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूललाही वेढा दिला आहे.
12 / 13
अमेरिकी सैन्याने २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात प्रवेश करून तालिबान सरकारला हुसकावून लावले होते. इस्लामिक शिरिया कायद्यानुसार तालिबान कारभार करते. यामध्ये महिलांना कामाची तसेच शिक्षणाची परवानगी नसते. पुरुष नातेवाईक सोबत असेपर्यंत महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही.
13 / 13
पुरुषांनी दाढी वाढवून डोक्यावर गोलाकार टोपी घालणे बंधनकारक असते. मनोरंजनाची साधने वापरण्यावर बंदी असते. याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाते. अमेरिकेने दणका दिल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतल्याचं सांगण्यात येते.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारत