शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काबुलवर कब्जा करण्यासाठी तालिबानला बोलावण्यात आलं होतं; माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 3:18 PM

1 / 8
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी काबूलवर तालिबानने मिळवलेल्या ताब्यावर मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी तालिबानला काबूलमध्ये बोलवले होते, असा मोठा गौप्यस्फोट हमीद करझाई यांनी केला आहे.
2 / 8
देश अराजकतेच्या छायेत सापडू नये म्हणूनच तालिबानला काबूलच्या संरक्षणासाठी काबूलमध्ये बोलावण्यात आल्याची माहिती करझाई यांनी दिली. तसे नसते तर कदाचित तालिबानने देशात लुटमार आणि अत्याचार केला असता, असेही ते म्हणाले.
3 / 8
अफगाणिस्तानचे तत्कालीन संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान यांनी करझाई यांना विचारले होते की, तुम्हाला अफगाणिस्तान सोडायचे आहे का? पण करझाई यांनी अफगाणिस्तान सोडण्यास नकार दिला. 9/11 च्या हल्ल्यानंतर हमीद करझाई 13 वर्षे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती होते.
4 / 8
करझाई म्हणाले की, तालिबान सत्तेवर येण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी संभाव्य कराराची उलटी गिनती सुरू झाली होती. अब्दुल्ला आणि मी अश्रफ घनी यांची भेट घेतली आणि त्यांनी सहमती दर्शवली की ते दुसऱ्या दिवशी दोहाला रवाना होतील आणि सत्तावाटप करारावर स्वाक्षरी करतील.
5 / 8
तालिबानी लढवय्ये आधीच काबूलच्या सीमेवर होते, पण तालिबानने आम्हाला वचन दिले की जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत आम्ही काबूलमध्ये येणार नाही. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने सांगितले की, सरकारने कार्यालयात राहावे आणि आमचा काबूलमध्ये येण्याचा कोणताही हेतू नाही. पण दुपारी 2.45 पर्यंत अशरफ घनी अफगाणिस्तान सोडून निघून गेले.
6 / 8
त्यानंतर मी संरक्षण मंत्री, गृहमंत्री, काबूल पोलीस प्रमुख यांना फोन केला पण तोपर्यंत सर्वजण निघून गेले होते. त्यावेळेस काबूलमध्ये एकही सरकारी अधिकारी नव्हता. घनीच्या सुरक्षा उपप्रमुखांनी हमीद करझाई यांना अफगाणिस्तानचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले होते, पण करझाई यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. कायदेशीररित्या असे करता येणार नाही, असे कारण त्यावेळी देण्यात आले.
7 / 8
अशरफ घनी यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण तोडगा निघावा यावर आम्ही ठाम होतो. आम्ही सर्वजण दुसऱ्या दिवशी सकाळी दोहाला जाण्याच्या तयारीत होतो पण त्याआधीच अशरफ घनी काबूलहून निघून गेले. करझाई यांनी पुढे सांगितले की, गेल्या 40 वर्षांत अफगाणांनी खूप त्रास सहन केला आहे. लष्कर, पोलीस, नागरिक, तालिबानी सैनिक मारले गेले. पण, आता तालिबानने सर्वांना चांगली वागणूक द्यावी. स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये, महिलांना अधिकार द्यावेत.
8 / 8
हा असा मुद्दा आहे ज्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. पण ते होईपर्यंत जगाला तालिबानसोबत राहावेच लागेल. जगातील देशांनी अफगाणिस्तानसोबत काम करण्याची गरज आहे. अफगाणिस्तानला जगाच्या मदतीची गरज आहे, असंही ते म्हणाले.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान