शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Turkiye Earthquake: 'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 3:09 PM

1 / 8
तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले. त्यातही तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वाधिक फटका बसला. या दोन देशांना सध्या स्मशानकळा प्राप्त झाली आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असताना प्रत्येक मिनिटाला मृतदेह सापडत असल्याने हाडे गोठवणाऱ्या थंडीतही बचावकर्त्यांना घाम फुटत आहे. तुर्की-सीरिया भूकंपात सुमारे २० हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
2 / 8
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानंतर सर्वत्र केवळ विध्वंस दिसत आहे. इमारतींच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण या सगळ्याच्या दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे. उत्तर सीरियामध्ये भूकंपाच्या ३६ तासांनंतर एका भाऊ आणि बहिणीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले.
3 / 8
अमेरिकन न्यूज वेबसाइट सीएनएनच्या रिपोर्टनुसार, बेसनाया-बसानेह हे सीरियातील हरम शहराजवळ एक छोटेसे गाव आहे. येथेही भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले. जेव्हा बचाव पथक येथे पोहोचले तेव्हा एक मुलगी आणि तिचा भाऊ ढिगाऱ्याखाली जिवंत गाडल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. ती मुलगी सुटका करणाऱ्याला म्हणाली, 'मला इथून बाहेर काढा, तुम्ही जे सांगाल ते मी करीन... मी आयुष्यभर तुमची नोकर म्हणून राहील. यावर बचावकर्त्याने उत्तर दिले... नाही, नाही.
4 / 8
गझियानटेप येथे राहणारा इर्डिम आणि त्याचे कुटुंब या भूकंपातून कसेतरी वाचले. घर सोडल्यानंतर काही क्षणांतच त्यांचे दुमजली घर पत्त्याच्या घरासारखे कोसळले. काही पाळीव प्राण्यांचा मात्र शोध लागला नाही. काल रात्रीच मी माझा जिवलग मित्र श्यादला घरी जेवायला बोलावले होते. भूकंपानंतर श्याद ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धावला. तिथे पोहोचल्यावर घराचा शेवटचा उरलेला भाग त्याच्या अंगावर पडला आणि सगळे संपले.
5 / 8
सीरियाच्या नागरी संरक्षणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, याला काय म्हणावे ते मला कळत नाही. मृतदेह बाहेर काढताना आपण थकलो आहोत. दर मिनिटाला कोणत्या ना कोणत्या ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढला जात आहे. सत्य हे आहे की, अशी आपत्ती हाताळण्याची क्षमता आपल्यात नाही. मृतदेह बाहेर काढता काढता काळीज दगडाचे झाले आहे.
6 / 8
हा भूकंप ‘इंटरसेक्टिंग फॉल्ट’मुळे झाल्याचे दिसते. जेव्हा एक भूगर्भाचा स्तर (टेक्टोनिक प्लेट) दुसऱ्यावर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. या विध्वंसात ३,४५० हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या. यापैकी बऱ्याच आधुनिक इमारती होत्या, ज्या संरचनेच्या ‘पॅनकेक मॉडेल’च्या आधारे बांधल्या गेल्या होत्या; परंतु, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर हे मॉडेल अपयशी ठरले, असे केगली यांचे मत आहे. अनेक इमारती पुरेशा भूकंपीय मजबुतीकरणाशिवाय काँक्रीटच्या बांधलेल्या होत्या.
7 / 8
सोमवारी पहाटे दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हजारो लोकांचा बळी गेला, पण सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (एसएसजीईओएस) संस्थेमध्ये काम करणाऱ्या फ्रँक हूगरबीट्स या संशोधकाने या दुर्घटनेचा इशारा तीन दिवस आधीच वर्तवला होता. ३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३३ वाजता त्यांनी “लवकरच किंवा नंतर, दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनच्या प्रदेशात ७.५ तीव्रतेचा भूकंप होईल” असे ट्वीट केले होते. त्यांनी भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही शेअर केला होता. तीन दिवसांनंतर त्यांचा इशारा खरा ठरला आणि ट्वीट प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
8 / 8
पृथ्वीच्या भूगर्भात मोठ-मोठ्या आकाराच्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. त्याखाली लाव्हारस आहे. त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. त्यांची ज्यावेळी एकमेकांशी टक्कर होते, त्यावेळी खूप दबावामुळे या प्लेट्सचे तुकडे होऊ लागतात. त्यामुळे भूगर्भातील ऊर्जा तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्यातून होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे भूकंप येतो. तुर्कस्थानचा बहुतांश भाग हा एनाटोलियन टॅक्टोनिक प्लेटच्या क्षेत्रात आहे. ही प्लेट युरोशियन, आफ्रिकन, अरेबियन या तीन प्लेटच्या मधोमध आहे. आफ्रिकन, अरेबियन प्लेट आपल्या जागेवरून हलली की तुर्कस्थानचा भाग असलेल्या प्लेटवर सारा दबाव येऊन त्या देशामध्ये भूकंप येतो.
टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय