शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Crisis: बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा किती दिवस टिकाव लागणार? सैन्य, विमाने, क्षेपणास्त्रांचा आकडा आला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 5:12 PM

1 / 11
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात येत आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केले असून, लुहान्स्क प्रदेशात रशियाची पाच विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे. या सगळ्यात आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, बलाढ्य अशा रशियाच्या सैन्यासमोर युक्रेन किती दिवस टिकणार? दोन्ही सैन्यात कोण जास्त सामर्थ्यवान आहे?
2 / 11
रशिया आणि युक्रेनच्या ताकदीबद्दल बोलायचे झाले तर, युक्रेन थोडा कमजोर असला तरी दीर्घकाळ संघर्ष करू शकतो. वेबसाइट ग्लोबफायरच्या अहवालानुसार, शक्तिशाली देशांच्या बाबतीत रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर युक्रेनचा विचार केला तर तो 22 व्या स्थानावर आहे.
3 / 11
रशियासोबत सक्रिय सैनिकांची संख्या 8.50 लाख आहे. दुसरीकडे, युक्रेनमध्ये फार कमी सक्रिय सैन्य आहे. पण राखीव सैन्याच्या संख्येच्या बाबतीत युक्रेनची रशियाशी स्पर्धा आहे. दोघांकडे 2.50 लाख राखीव सैन्य दल आहे. निमलष्करी दलांचा विचार केला तर रशिया खूप पुढे आहे. रशियाकडे 2.50 लाख निमलष्करी दले आहेत तर युक्रेनमध्ये फक्त 50,000 निमलष्करी दले आहेत.
4 / 11
रशियाच्या हवाई लष्करी सामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर ते जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर युक्रेनची रँकिंग 31 वी आहे. रशियाकडे एकूण 4173 तर युक्रेनकडे 318 विमाने आहेत. दुसरीकडे, रशियाकडे असलेल्या एकूण लढाऊ विमानांची संख्या 772 आहे, तर युक्रेनकडे केवळ 69 लढाऊ विमाने आहेत.
5 / 11
रशियाच्या ग्राउंड पॉवरबद्दल बोलायचे झाले तर रणगाड्यांच्या बाबतीत तो जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. रशियाकडे एकूण 12,420 रणगाडे आहेत तर युक्रेनकडे 2596 आहेत. चिलखती वाहनांबद्दल बोलायचे झाले तर, रशिया संपूर्ण जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर युक्रेन सहाव्या स्थानावर आहे.
6 / 11
या संघर्षात नौदलाचा थेट संपर्क असण्याची शक्यता नसली तरी, युक्रेनच्या एकूण 38 नौदल जहाजांच्या तुलनेत रशियाकडे विमानवाहू जहाजासह 600 हून अधिक नौदल जहाजे आहेत. रशियाकडे समुद्रात हल्ला करण्यासाठी 70 पाणबुड्या आहेत, तर युक्रेनकडे एकही पणबुडी नाही.
7 / 11
युक्रेनकडे रशियाच्या तुलनेत लष्कर कमी असले तरी, युक्रेनला पाश्चात्य देशांची मदत मिळणार आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह हे विविध पाश्चात्य शक्तींकडून येणाऱ्या लष्करी मदतीबाबत ट्विटरवरुन माहिती देत आहेत. जमिनीवरुन हवेत मारा करणारे स्टिंगर क्षेपणास्त्रे, दारुगोळा, रायफल, ऑप्टिकल व्हिजन असलेल्या मशीन गन हे युक्रेनच्या ताफ्यात सामील आहेत.
8 / 11
याशिवाय, युक्रेन अमेरिकेकडून आणलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. डिसेंबरपासून युक्रेनला शेकडो जॅव्हलिन क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे, ज्यामुळे युक्रेनच्या सैन्याला रशियन रणगाड्यांना लक्ष्य करण्यात मदत होईल. हे मॅन-पोर्टेबल फायर-अँड-फॉरगेट अँटी-टँक क्षेपणास्त्र आहे, याचा अर्थ एक सैनिक त्याच्या खांद्यावर ठेवून हल्ला करू शकतात.
9 / 11
युक्रेन ज्या प्रकारे नाटोच्या जवळ आहे आणि अनेक नाटो देश युक्रेनच्या सीमेवर आपले सैन्य पाठवत आहेत. नाटो देशांनी युक्रेनच्या शेजारील देशांना सैन्य, शस्त्रे आणि लष्करी वाहने देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन नाटो युक्रेनला पाठिंबा देत असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत नाटोने त्याला पाठिंबा दिल्यास ते रशियाला जड जाऊ शकते.
10 / 11
ब्रिटन युक्रेनला टँकविरोधी शस्त्रे आणि चिलखती वाहनेही पुरवत आहे. पोलंडने म्हटले आहे की, ते युक्रेनला गॅस आणि तोफखाना दारूगोळा, मोर्टार, पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली, पाळत ठेवणारे ड्रोन आणि शस्त्रे पुरवतील. नाटो सदस्य देश रोमानियाची सीमा युक्रेनशी आहे. रोमानिया 2004 पासून सदस्य आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या देशांचे सैन्य येथे आहे.
11 / 11
नाटो संघटनेत 30 देश आहेत. नाटोच्या आंतरराष्ट्रीय लष्करी युतीचे मुख्य तत्व म्हणजे त्याची सामूहिक संरक्षण व्यवस्था. संघटनेच्या नियमांनुसार, जर कोणत्याही देशाने सदस्य देशांवर हल्ला केला तर तो संपूर्ण संघटनेवर हल्ला मानला जाईल. या आधारावर सर्व देश त्याच्या पाठीशी असतील. युक्रेन नाटोचे सदस्य नसले तरी नाटोची इच्छा असल्यास युक्रेनला पाठिंबा देऊ शकतात.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDefenceसंरक्षण विभाग