शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! बलाढ्य चीन जवळ अमेरिकेने एकामागोमाग एक उतरविली १३० विमाने; एलिफंट वॉकने ड्रॅगन खवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 7:27 PM

1 / 9
चीन आणि रशिया विरोधात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं प्रशांत महासागरात सर्वात मोठ्या युद्धसरावाला सुरुवात केली आहे. कोप नॉर्थ २२ नावानं सुरू करण्यात आलेल्या या युद्ध सरावात अमेरिकेसह जापान आणि ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं सहभाग घेतला. गुआमच्या अँडरसन एअरफोर्स बेसवर आयोजित या युद्ध सरावाच्या माध्यमातून अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियानं 'एलिफंट वॉक' करत ताकदीचं दर्शन घडवलं आहे.
2 / 9
'एलिफंट वॉक' म्हणजेच लढाऊ विमानांच्या परेडमध्ये यावेळी तब्बल १३० लढाऊ विमानं एकाचवेळी सहभागी झाली होती. तब्बल १३० विमानानंच लाइनअप करुन त्यांचं उड्डाण देखील करण्यात आलं. इतकंच नव्हे तर या लढाऊ विमानांनी यावेळी हवेत कर्तब करत आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.
3 / 9
विशेष बाब म्हणजे, चीनपासून केवळ २९०० किमी दूर असलेल्या अँडरसन एअरफोर्स बेसवर शक्तिप्रदर्शन करुन अमेरिकेनं उघडपणे चीन व रशियासमोर डोळे वटारले आहेत. गुआम प्रशांत महासागरात अमेरिकेचे मोठ्या प्रमाणात हवाई आणि नौदल ठिकाणं आहेत. या अड्ड्यांवरुन प्रशांत महासागरात रशिया आणि चीनकडून केल्या जाणाऱ्या आक्रमकतेला लगाम घालण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे.
4 / 9
इतकंच नव्हे, तर या नेव्हल बेसच्या माध्यमातून अमेरिका उत्तर कोरियावरही लक्ष ठेवून आहे. याशिवाय अमेरिकेचा जपानमध्येही नौदल तळ आहे. अशापद्धतीनं हजारो किलोमीटर दूर असूनही अमेरिका आशिया खंडातील एक बलाढ्य रणनिती आणि सैन्य खेळाडू ठरला आहे.
5 / 9
कोप नॉर्थ २२ युद्ध सरावाच्या माध्यमातून अमेरिका आणि त्यांच्या साथीदार देशांनी थेट चीन व उत्तर कोरिआला आपल्या मारक क्षमतेचं दर्शन घडवलं आहे. २ ते १८ फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या या युद्ध सरावात २५०० हून अधिक अमेरिकन पायलट, मरीन आणि सेलर्सचा समावेश आहे. याशिवाय जपान आणि ऑस्ट्रेलियाचे १ हजार नौदल सैनिक देखील सहभागी होणार आहेत.
6 / 9
कोप नॉर्थ २२ युद्ध सरावाची १९७८ सालापासून सुरुवात करण्यात आली होती. १९९९ पर्यंत हा युद्ध सराव जपानच्या मिसावा एअर बेसवर आयोजित करण्यात येत होता. त्यानंतर गुआमच्या अँडरसन एअरफोर्स बेसवर शिफ्ट करण्यात आला.
7 / 9
एलिफंट वॉक हा शब्द दुसऱ्या महायुद्धानंतर वापरला जाऊ लागला. त्यावेळी शत्रुवर आक्रमण करण्यासाठी एकाचवेळी मोठ्या संख्येनं लढाऊ विमानांतून बॉम्ब हल्ला करण्यासाठी टेकऑफ केलं जातं होतं. विमानांनी एकाच वेळी टेकऑफ केल्यानंतर जणू हत्तींचा कळप एकत्र चाल करून येतोय असं वाटायचं. तेव्हापासूनच लढाऊ विमानांच्या वॉकला एलिफंट वॉक म्हटलं जाऊ लागलं.
8 / 9
'एलिफंट वॉक'मध्ये ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, लढाऊ विमानं, मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, अॅटॅक हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टरचा समावेश असतो. गुआम नावाच्या प्रशांत महासागरातील एका छोटाशा बेटावर अमेरिकेचं प्राबल्य आहे. या बेटावरुन अमेरिकन सैन्य फक्त चीन आणि उत्तर कोरिआवर फक्त नजर ठेवत नाही, तर त्यांना जशासतसं उत्तर देण्यासही हे बेट मोलाची भूमिका पार पाडू शकतं.
9 / 9
गुआम बेटावर आताच अमेरिकेचे ५ हजार सैनिक तैनात आहेत. इथं तैनात असलेल्या अमेरिकन स्ट्रॅटजिक बॉम्बर विमानांतून चीनच्या हवाई क्षेत्राजवळ घिरट्या घालत असतात आणि चीनच्या हरकतींवर नजर ठेवली जाते.
टॅग्स :USअमेरिकाchinaचीनrussiaरशियाJapanजपानAustraliaआॅस्ट्रेलिया