शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मैत्रिणीकडे ईदच्या पार्टीला गेला, बिर्याणीसोबत दीड लाखाचे दागिने गिळले, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 5:25 PM

1 / 8
दोनच दिवसांपूर्वी देशात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदच्या दिवशी अनेक मुस्लिम घरांमध्ये बिर्याणी केली जाते. चेन्नईत वास्तव्यास असलेल्या एका महिलेच्या घरातही ईदनिमित्त बिर्याणीचा बेत होता. तिनं आपल्या मैत्रिणींना मेजवानीसाठी बोलावलं होतं.
2 / 8
ईदची पार्टी मोठ्या आनंदात पार पडली. मात्र काही वेळातच महिलेच्या आनंदावर विरजण पडलं. कारण घरातून जवळपास दीड लाखाचे दागिने चोरीला गेल्याचं तिच्या लक्षात आलं. घरात शोधाशोध करूनही दागिने न सापडल्यानं महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतरचा घटनाक्रम धक्कादाक होता.
3 / 8
न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ३ मे रोजी ईदच्या दिवशी एका महिलेनं तिच्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या प्रियकराला घरी बोलावलं होतं. दोघेही घरी गेले. गप्पा झाल्या. जेवताना मैत्रिणीच्या प्रियकरानं एक भलताच पराक्रम केला.
4 / 8
प्रियकराला घरातून दागिने चोरायचे होते. मात्र कसे चोरावे या विचारात होता. त्यावेळी त्याला एक अजब कल्पना सुचली. त्यानं दागिने बिर्याणीसोबत गिळले. सगळे पाहुणे घरी गेल्यावर महिलेला आपले १.४५ लाखांचे दागिने चोरीला गेल्याचं समजलं.
5 / 8
महिलेला मैत्रिणीच्या प्रियकरावर शंका आली. तिनं तातडीनं विरुगमबक्कम पोलीस स्टेशन गाठलं. तक्रार नोंदवली. पोलिसांनी मैत्रिणीच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या. यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
6 / 8
पोलिसांनी आरोपीचं पोट स्कॅन केलं. त्यात त्यांना दागिने आढळून आले. बिर्याणी खात असताना आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. तेव्हा चोरी करण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्यानं बिर्याणीसोबत दागिने गिळले.
7 / 8
डॉक्टरांनी आरोपीला एनिमा दिला. त्यानंतर त्याच्या पोटातून ९५ हजारांचा हार आणि २५ हजारांचे इतर दागिने काढण्यात आले. मात्र हाराचं पेंडंट आतच राहिलं. पेंडंट बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी त्याला लॅक्सेटिव्ह दिलं. त्यामुळे पेंडंटही मिळालं.
8 / 8
महिलेला दोन दिवसांतच तिचे दागिने परत मिळाले. आरोपी मैत्रिणीचा प्रियकर असल्यानं फिर्यादी महिलेनं पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेतली.