शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Do You Know? काय सांगता! देशभरात ३,६०० गावे ‘राम’नामावर, तर ३,३०९ गावांच्या नावांमध्ये कृष्णाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 6:16 PM

1 / 12
श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही ईश्वरी अवतार. आपल्या भारतीय संस्कृतीची ही दोन अत्युच्च शिखरे आहेत. प्रभू रामचंद्रांनी स्वत:च्या आचरणातून 'मर्यादापुरुषोत्तम' ही बिरुदावली सार्थ करून दाखवली; तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि वेळेप्रसंगी अन्य व्यक्तींच्या सहकार्याने कशी मात करावी, ते शिकविले, असे सांगितले जाते.
2 / 12
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक संघर्ष सर्वश्रुतच आहे. यानंतर अयोध्या तो झांकी है, मथुरा अभी बाकी है, अशा घोषणाही ऐकायला मिळाल्या. दुसरीकडे आपल्या देशातील ग्रामीण भागांमध्ये गावांची नावे मोठ्या प्रमाणात देवांच्या नावावरून ठेवली गेल्याचे पाहायला मिळते.
3 / 12
एवढेच नव्हे तर अनेक गावांची नाव चित्रपटांपासून प्रभावित होऊन ठेवण्यात आली आहेत. एका अभ्यासातील माहितीनुसार, केरळ वगळता देशातील सर्वच राज्यांमध्ये किमान एका गावाचे तरी नाव प्रभू श्रीराम आणि भगवान कृष्णाच्या नावावर आहे. (3626 village named after lord sri rama)
4 / 12
या माहितीनुसार देशभरात रामाच्या नावाची तब्बल ३ हजार ६२६ गावे होती. तर, कृष्णाच्या नावावर ३ हजार ३०९ गावे होती. याशिवाय गणपती बाप्पांच्या नावावर ४४६ आणि गुरुनानक साहेबांच्या नावावर ३५ गावे आहेत. देशात बंगालच्या नावावर ९२ गावांची नाव आहेत. आणि विशेष म्हणजे यापैकी कोणतंच गाव पश्चिम बंगालमध्ये नाही.
5 / 12
बंगाल नावाची सर्वाधिक गावे महाराष्ट्र, पंजाब आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आहेत. उत्तर भारतात केरळ नावाची ३३ गावे आहेत. याशिवाय देशात १७ प्रयागराज, ४१ काशी आणि २८ आग्रा आहेत. यापैकी आग्रा नावाची गावे मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आहेत. १८९ गावांची नावे बिहारपासून सुरू होतात. यापैकी १७१ गावे बिहारच्या बाहेर आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका नावाची भारतात २८ गावे असून नेपाळच्या नावावर ४० गावे आहेत.
6 / 12
उत्तराखंडच्या पौराणिक स्थळांवर अनेक गावांची नावे आहेत. तसेच अशीही अनेक नावे आहेत, ज्यामध्ये एखाद्या धामाचे नाव येते. देशात ४७ गावांची नावे बद्रीवरून सुरू होतात. तर, ७५ गावांच्या नावात केदार आहे. यापैकी बहुतांशी गावे ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये आहेत. (3309 village named after lord sri krishna)
7 / 12
देशातील १८७ गावांची नाव भरत नावावर आहेत. तर, १६० गावांची नावे लक्ष्मणच्या नावावर आहेत. सीता नावावरची ७५ गावे असून हनुमानांच्या नावावर तब्बल ३६७ गावांची नावे आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे देशात रावणाच्या नावावर सहा गावे आहेत. बिहारमधील तीन गावांची नावे तर रावणाचे वडील अहिरावण यांच्या नावावर आहेत. तर रावणाचा भाऊ विभीषणच्या नावावर कोणतेच गाव नाही. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील काही गावांची नावे अयोध्या आहेत.
8 / 12
महाभारतातील कृष्ण नावावर गावांची नावे ठेवण्याला लोकांची पसंती दिसून येते. देशात कुरुक्षेत्र नावावर कोणतेच गाव नाही. तर, धर्मराज युधिष्ठिर यांच्या नावावर दोन गावे आहेत. तर, भीमाच्या नावाची ३८५, अर्जून २५९, धृतराष्ट्र ८, कंसाच्या नावावर ४२ गावांची नावे आहेत. तर, ओडिशातील केवळ एका गावाचे नाव भीष्मांच्या नावावर आहे.
9 / 12
मुघल राज्यकर्त्यांच्या नावांवरही अनेक गावांची नावे असल्याचे दिसून येते. अकबर यांच्या नावावर २३४ गावांची नावे आहेत. तर, बाबर यांच्या नावावर ६२, हुमायूं ३०, शाहजहां ५१ आणि औरंगजेब यांच्या नावावर ८ गावे असून ती सगळी गावे उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात आहेत.
10 / 12
आधुनिक भारतील नेत्यांच्या नावांवरून अनेक गावांची नावे आहेत. महात्मा गांधींच्या नावावर देशात ११७ गावे आहेत. तर, जवाहरलाल नेहरूंच्या नावावर ७२ गावे आहे. लाल बहादुर शास्त्रींच्या नावावर एकही गावाचे नाव नाही.
11 / 12
तर, इंदिरा गांधींच्या नावावर ३६, राजीव गांधीच्या नावावर १९ आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर केवळ १३ गावं आहेत. तर, सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर २७ गावांची नावे आहेत.
12 / 12
देशात शोले चित्रटातील रामगढ नावावरून १६३ गावांची नावे ठेवण्यात आली आहेत. तर, आमिर खानच्या पीपली लाइव्ह चित्रपटावरून २७ गावांची नावे पीपली ठेवण्यात आली. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले असून, यासाठी ६ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त गावांच्या नावांचा अभ्यास करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndiaभारतramayanरामायणMahabharatमहाभारत