शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकेकाळी नशेच्या विळख्यात अडकलेलं 'हे' गाव; आज प्रत्येकजण बनलाय बुद्धिबळ चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 09:54 IST

1 / 10
दोन पुरुष समोरासमोर बसले आहेत. एकाचे केस पांढरे झाले आहेत आणि दुसरा अगदी तरुण आहे, लुंगी घातली आहे. दोघेही एका ताडाच्या झाडाखाली बसले आहेत, आजूबाजूला अनेक लोक आहेत. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. सर्वांच्या नजरा जमिनीवर ठेवलेल्या बुद्धिबळाच्या पटलावर लागल्या आहेत. अचानक आवाज येतो आणि मग पुन्हा शांतता. हे दृश्य केरळच्या त्रिशूर जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या मारोत्तिचल गावाचे आहे. या गावाला बुद्धिबळाचे गाव (chess village) म्हणून ओळखलं जातं.
2 / 10
केरळमधील या गावात बुद्धिबळ हे केवळ मनोरंजन नसून तर ती आवड आहे. गावातील ६ हजार लोकांपैकी ४ हजाराहून अधिक लोक बुद्धिबळ हा खेळ मोठ्या प्राविण्य आणि आवडीने खेळतात. येथील गावकरी, तरुण आणि वृद्ध, स्त्री-पुरुष, नगरपालिकेचे सफाई कामगार आणि इतर कुणीही असो त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते बुद्धिबळ खेळतात.
3 / 10
२०२२ मध्ये चेन्नई येथे चेस ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले तेव्हा बुद्धिबळ गाव म्हणून मारोत्तिचलची ख्याती वाढली. जागतिक बुद्धिबळ महासंघाने असोसिएट ग्रँडमास्टर दीपशिखा मार्चला येथे पाठवले. त्यावेळी एकाच ठिकाणी १००० हून अधिक खेळाडूंच्या सहभागासह बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती.
4 / 10
याठिकाणचे स्थानिक उन्नीकृष्णन यांच्या उन्नीच्या चहाच्या दुकानात लोक बुद्धिबळ शिकण्यासाठी येतात. याशिवाय त्यांनी ३० लोक बसण्यासाठी एक हॉल बनवला आहे, जिथे लोक बुद्धिबळ खेळतात. आज बुद्धिबळ खेळणारं हे गाव कधीकाळी असं नव्हते. सी. उन्नीकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या एका गटाने गावात बुद्धिबळाची क्रेझ सुरू केली.
5 / 10
७० च्या दशकात मारोत्तिचल गाव हे दारुड्यांचा आणि जुगारांचा अड्डा होता. आपले मित्र आणि शेजारी दारूमुळे वाया जात असल्याचे पाहून उन्नीकृष्णन लोकांना बुद्धिबळाकडे आकर्षित करू लागले. दारूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी युवा चेतना ही चळवळ सुरू केली. कॅथोलिक धर्मगुरू फादर गिल्स चेट्टुपुझाकरन यांच्या नेतृत्वाखाली उन्नीकृष्णन त्या चळवळीत सक्रिय झाले.
6 / 10
सुरुवातीला त्यांना फारसं यश आलं नाही. परंतु त्याच्या चिकाटीमुळे लवकरच मारोत्तिचलला नशेच्या विळख्यातून मुक्त करत बुद्धिबळाचे चांगले व्यसन लागले. गावच्या या यशस्वी कहाणीनं प्रेरित होऊन मुंबईस्थित पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते कबीर खुराना यांनी 'द पॉन ऑफ मारोत्तिचल' नावाचा चित्रपट बनवला आहे, ज्यात बुद्धिबळ गावातील सहा रहिवासी पाहुण्यांच्या भूमिकेत आहेत.
7 / 10
गावात दुपारच्या झोपेच्या वेळी, शाळेच्या सुट्टीच्या वेळी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानात बुद्धिबळाचे पट भरवले जातात. पटाचा राजा, त्याचे सैन्य पटलावर उतरवलेले असते आणि बुद्धिबळाचा खेळ सुरू होतो. लोक त्यांच्या रिकाम्या वेळेत बुद्धिबळालाच प्राधान्य देतात.
8 / 10
मारोत्तिचल गावात कधीकाळी संध्याकाळी ७ नंतर प्रवेश करताना बाहेरचे लोक ४ वेळा विचार करायचे. दारू आणि जुगारामुळे लोकांमध्ये हाणामारी आणि वादविवाद सातत्याने व्हायचे. गावातील या समस्येमुळे कुणीही या गावात यायचा नाही. लोकांची हीच सवय मोडून काढण्यासाठी सी. उन्नीकृष्णन यांनी पुढाकार घेतला.
9 / 10
आज मारोत्तिचल गावात प्रत्येक घरातील १ सदस्य तरी बुद्धिबळ खेळतो. संध्याकाळ होताच टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ न घालवता लोक बुद्धिबळ खेळण्याच्या उद्देशाने एकत्रित जमतात. या गावाने एकाचवेळी १ हजार बु्द्धिबळ खेळण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकजण खेळात सहभागी होतो.
10 / 10
कबीर खुराना दिग्दर्शित ६० मिनिटांचा 'द पॉन ऑफ मारोत्तिचल' हा चित्रपट उन्नीकृष्णन यांच्या प्रयत्नातून आणि गावाच्या विकासापासून प्रेरित आहे. कबीर खुराना, किरीट खुराना आणि मयंक टंडन यांनी ही कथा लिहिली आहे, ज्याची कथा दारूच्या व्यसनाशी झुंजत असलेल्या कुटुंबाभोवती फिरते. वडिलांना आशा वाटते जेव्हा त्यांची मुलगी बुद्धिबळ स्पर्धा जिंकते आणि तिच्या कुटुंबात आणि समाजात बदल घडवून आणते.
टॅग्स :Chessबुद्धीबळKeralaकेरळ