शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jara hatke: परपुरुष आवडताच महिला लग्न मोडून थाटतात नवा संसार, Pakistanमधील या जमातीमध्ये आहे अजब प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 4:36 PM

1 / 9
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेली कलाशा जमात पाकिस्तानमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्याकामधील जमात म्हणून ओळखली जाते. ही जमात काही चित्रविचित्र प्रथांसाठी ओळखली जाते. या जमातीमधील विवाहित महिलांना परपुरुष आवडल्यास त्या लग्न मोडतात. आज आपण जाणून घेऊयात या जमातीमधील काही वैशिष्ट्यांबाबत...
2 / 9
कलाशा जमात ही खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील चित्राल खोऱ्यातील बाम्बुराते, बिरीर आणि रामबूर क्षेत्रामध्ये वास्तव्यास आहे. ही जमात वास्तव्यास असलेला भाग हिंदूकुश पर्वताने वेढलेला आहे. त्यामुळेच आपली संस्कृती सुरक्षित राहिल्याची या जमातीची भावना आहे. ही जमात सिकंदराचे वंशज असल्याचेही मानले जाते.
3 / 9
२०१८ मध्ये पाकिस्तानच्या जनगणनेमध्ये वेगळी जमात म्हणून कलाशा जमातीचा समावेश करण्यात आला. या जमातीची लोकसंख्या ३ हजार ८०० असल्याचे समोर आले. येथील लोक लाकूड आणि मातीने बनवलेल्या छोट्या छोट्या घरांमध्ये राहतात. तसेच कुठल्याही सणाला स्त्री-पुरुष एकत्र येऊन मद्यपान करतात. या जमातीमध्ये संगीत प्रत्येक प्रसंगासाठी खास असते. सणांवेळी बासरी आणि ड्रम वाजवून नाचतात. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बहुसंख्याकांच्या दहशतीमुळे या जमातीला संरक्षणासाठी पारंपारिक शस्त्रांसोबत बंदुकाही बाळगाव्या लागतात.
4 / 9
कलाशा जमातीमध्ये कुटुंबासाठी कमाई करण्याचे काम स्त्रिया करतात. त्या बकऱ्यांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन जातात. तसेच घरीच पर्स आणि रंगीत माळा तयार करतात. त्यांची विक्री करण्याचे काम पुरुष करतात. येथील महिलांना नटण्या-थटण्याची आवड आहे. त्या डोक्यावर खासप्रकारची टोपी आणि गळ्यांमध्ये दगडांची रंगीत माळा घालतात.
5 / 9
येथे वर्षभरात तीन सण साजरे केले जातात. त्यातील Camos हा सर्वात मोठा सण मानला जातो. यावेळी स्त्री-पुरुष, मुले-मुली एकमेकांना भेटतात. यादरम्यान अनेक नवी नाती जोडली जातात. या जमातीमध्ये लैंगिक संबंधांबाबत कमालीचा मोकळेपणा आहे. येथील महिलांना जर दुसरा पुरुष आवडला तर त्या आधीचं लग्न मोडून त्याच्यासोबत संसार थाटू शकतात.
6 / 9
पाकिस्तानसारख्या देशात महिलांच्या स्वातंत्र्याविरोधात अनेक फतवे निघतात, तिथे या जमातीमधील महिलांना आवडता जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्या पती निवडू शकतात. तसेच पतीसोबत आनंदी नसतील तर नवा जोडीदार निवडू शकतात आणि कुठल्याही वादविवादाविना त्याच्यासोबत राहू शकतात.
7 / 9
आधुनिक विचार असले तरी या समाजात महिलांवर काही निर्बंध आहेत. मासिक पाळीदरम्यान, त्यांना घराबाहेर तयार केलेल्या घरात राहावे लागले. यादरम्यान, त्यांना अपवित्र मानले जाते. या काळात त्यांना हात लावल्यास देव नाराज होईल असे मानले जाते. या काळात या महिला जिथे राहतात त्याला बशाली घर म्हणतात.
8 / 9
या समुदायामधील अनेक रीतीरिवाज वेगळे आहेत. या जमातीमधील लोक मृत्यू झाल्यावर रडत नाहीत, तर हा आनंदाचा सण मानला जातो. मृत्यूनंतरच्या विधीवेळी ले लोक जाणाऱ्याचा आनंद व्यक्त करत नाचतात, गातात आणि मद्यपान करतात. देवाच्या मर्जीने आपण इथे आला होता आणि त्याच्याच मर्जीने जात आहे, असे मानले जाते.
9 / 9
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणावाचा फटका कलाशा जमातीलाही बसत आहे. आधी हँडीक्राफ्टच्या कामामधून त्यांची कमाई व्हायची. मात्र आता पर्यटक जवळपास येतच नाहीत. त्यामुळे या समुदायाला गरिबीचा सामना करावा लागत आहे. तसेच येथील पुढची पिढी हा भाग सोडून अन्य देशात जाण्याचा विचार करत आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तान