शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमाल! एका व्यक्तीने स्वखर्चातून केला संपूर्ण गावाचा ‘विकास’; आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:42 PM

1 / 10
देशात अनेक वृत्ती, प्रवृत्तीचे लोक राहात असतात. गावा-खेड्यातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरे झालेली देशाने पाहिली आहेत. मात्र, पुन्हा गावाकडे येणाऱ्यांची संख्या नगण्य असते.
2 / 10
मात्र, उत्तर प्रदेशातील एटा या गावात राहणाऱ्या व्यक्तीने स्वखर्चातून संपूर्ण गावाचा विकास करण्याची किमया केली आहे. शहरात जाऊन कमावलेली संपत्ती गावच्या विकासासाठी अर्पण करत एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
3 / 10
गावातील विकास कामे आणि अन्य गोष्टी पाहून अलीगडच्या आयुक्तांनीही भुवया उंचावल्या. एटामधील हैदरपूर नामक गावातील विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी आयुक्तांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
4 / 10
संपूर्ण गावाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव रामगोपाल दीक्षित आहे. शिक्षणासाठी ते गाव सोडून दिल्लीला गेले. तेथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसायही उत्तम प्रकारे चालला. यानंतर अनेक वर्षांनी ते गावात परत आले.
5 / 10
रामगोपाल दीक्षितांना गावाची अवस्था पाहून धक्काच बसला. रस्त्यांची दुरावस्था झाली होती, तर गावातून फिरण्यासाठीही योग्य मार्ग नव्हता. येथील लोकप्रतिनिधी या गावात कधी फिरकले नसल्याचे समजले.
6 / 10
शेवटी रामगोपाल दीक्षित यांनी गावात विकास कामे राबवण्याचा संकल्प केला. आपल्याजवळील सुमारे २.५ कोटी रुपयांची रक्कम खर्च करून गावातील रस्ते सुधारले. कच्चे मार्ग पक्के केले. यानंतर गावात एक कम्युनिटी पार्क तयार केले. यासाठी दीक्षितांनी खासगी जमीनही दान केली.
7 / 10
गावातील शाळेची परिस्थितीही चांगली नव्हती. तेथे शौचालयाची योग्य व्यवस्था नव्हती. शाळेची डागडुजी करून शौचालय बांधले. याशिवाय अनेक बारीक-सारीक गोष्टी करून गावाचा अगदी कायापालट केला. याबाबत ते अगदी समाधान व्यक्त करतात.
8 / 10
मी खूपच गरीब कुटुंबातून आलो आहे. शिक्षणासाठी गाव सोडले. अतिशय संघर्ष, मेहनत करून या ठिकाणी मी पोहोचलो आहे. गरिबीचे चटके सोसल्यामुळे त्याची जाणीव मला आहे. देवाने जे काही मला दिले, ते सर्व अर्पण करणे माझे कर्तव्य मानतो. जीवनाचा काहीच नेम नाही.
9 / 10
१० ते १५ वर्षे गावातील प्रत्येक घरात पाणीही नव्हते. गावाच्या विकासाचा संकल्प केल्यावर पाण्याच्या कनेक्शनपासून ते अगदी रस्ते पक्के करण्यापर्यंत अनेक कामे केली. गावातील मुलामुलींच्या लग्नासाठी एटा येथे जावे लागत असे. त्यासाठी कम्युनिटी हॉलही बांधला.
10 / 10
गावाच्या विकासासाठी माझ्याकडील २.५ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय बँकेकडून ६५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. आपल्या घरासाठी एखादा माणूस जे काही करेल, ते माझ्या गावासाठी केल्याचे समाधान रामगोपाल दीक्षित यांनी व्यक्त केले.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी