सरकारी नव्हे 'या' ठिकाणी होती भारतातील खाजगी रेल्वे, फुकटात प्रवास करायचे गरीब प्रवासी... By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 6:18 PM
1 / 10 २५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. 2 / 10 त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोमठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती. 3 / 10 क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी (CPRC) असे झाले होते ) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १०० वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला गेला होता. त्यामुळे इ.स. २००३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. 4 / 10 १९९४ पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. १५ एप्रिल १९९४ पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही. 5 / 10 अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी होती. मात्र तरीही तिचा वेग थट्टेचा विषय होता. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घ्यायची. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. 6 / 10 दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या. 7 / 10 काही काळानंतर ही गाडी यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावत होती. असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाबाबत झाला होता. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नव्हती. 8 / 10 यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी होती. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकावरच संसार सुरू होता. 9 / 10 या गाडीचा वेग इतका कमी होता की कुणीही धावत्या गाडीत चढू वा उतरू शकत होता. 'हात दाखवा एसटी थांबेल', अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा त्याच्याही पूर्वीपासून सांभाळली होती. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघायची. तिकीट काढलेच पाहिजे असेही नव्हते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी असायची. 10 / 10 रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवायचा. फाटक लावून घायचा. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडायचा व त्यानंतर गाडी पुढे निघयाची, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते. आणखी वाचा