शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुखांत! तिरडीला खांदा देण्यापासून अत्यंविधीपर्यंत: ३७,७०० रुपये पॅकेजमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 3:31 PM

1 / 10
गेल्या काही वर्षांत भारतातील प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल झालेले दिसून आलेत. आता भारतात स्टार्ट अप्सचा ट्रेंड वाढू लागलाय. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा होत आहे. यामध्ये असे काही उद्योग आहेत जे लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतात. मुंबईतील एक स्टार्टअपही सध्या देशात बरीच चर्चा होत आहे.
2 / 10
दिल्लीत द इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेयर सुरू आहे. त्याठिकाणी वेगवेगळे स्टार्टअप स्टॉल पाहायला मिळतायेत. या ठिकाणी देश-विदेशातील हजारो कंपन्यांचे स्टॉल आहेत. यात मुंबईतून येथे आलेल्या एका स्टार्टअप्सने लोकांचे लक्ष केंद्रीत केले आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
3 / 10
मुंबईतील सांताक्रूझ परिसरात असलेल्या 'सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट कंपनी'कडून मृत लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी अंत्यविधी केला जातो. त्यासाठी कंपनी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. तिरडीला खांदा देण्यापासून, सोबत चालणे, 'राम नाम सत्य है' बोलणारे लोक आणि पंडित-न्हावी, सर्व काही ही कंपनी देते. यासोबतच मृतांच्या अस्थी विसर्जनाची सर्व व्यवस्थाही तेच करतात.
4 / 10
मृत्यूनंतरच्या अंतिम संस्काराची जबाबदारी कुटुंबाची असते हे सर्वांना माहितीये. भारतात ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. पण बदलत्या भारतासोबत प्रथा आणि चालीरीतीही बदलत आहेत. या जगात, आता मॅनेजमेंट कंपन्या उत्सवापासून अंत्यसंस्कारापर्यंत सर्वकाही मॅनेज करण्यासाठी पुढे आल्या आहेत.
5 / 10
सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट कंपनीचे मालक संजय रामगुडे सांगतात की, शहरांच्या धावपळीच्या जीवनात अंत्यसंस्काराची प्रक्रिया खूप अवघड झालीय. अशा परिस्थितीत मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी बरीच व्यवस्था करावी लागते.
6 / 10
अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी लोक आणि वस्तूंची गरज असते, म्हणूनच आम्ही या कंपनीच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणखी काही वेळ घालवण्यासाठी तसेच होणारा त्रास टाळण्यासाठी अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी आमच्यावर घेतो असं कंपनीनं म्हटलं.
7 / 10
रिपोर्ट्सनुसार, ही कंपनी एका अंत्यसंस्कारासाठी ३७,७०० रुपये आकारते. दिल्लीत त्यांच्या या स्टॉलवर लोकांची गर्दी असते आणि लोक सेल्फीही काढत असतात. त्याचवेळी सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. याची काय गरज होती? असं काहीजण टीका करतायेत तर दुसरीकडे, हे सर्व काळानुसार बदलाचे लक्षण असल्याचे काही लोकांनी म्हटलंय.
8 / 10
या पॅकेजमध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणार्‍या सर्व वस्तू धर्म आणि जातीनुसार पुरविल्या जातात. साधी माचिस आणण्याचाही भार कुटुंबावर पडणार नाही याची काळजी कंपनी घेते. त्याचसोबत रुग्णवाहिका सेवा दिली जाते. मृत व्यक्तीला रुग्णालयातून घरी आणि नंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत हलवण्यासाठी ही सेवा आवश्यक असते.
9 / 10
सुखांत कंपनीचे कर्मचारी कुटुंबासोबत असतील आणि अंत्यसंस्कारासाठी करावयाची सर्व व्यवस्था ते पाहतील, कुटुंबाला पूर्ण वेळ मृतदेहासोबत राहण्यासाठी वेळ मिळेल. त्याचसोबत कंपनीकडून एक डेड बॉडी पोर्टेबल फ्रीझर दिला जातो. ज्यात मृतदेह ठेवता येतो. यामुळे कुटुंबाला हॉस्पिटलच्या शवागारात जागा शोधण्याची गरज भासत नाही.
10 / 10
या अंत्यसंस्कारावेळी सुखांत कंपनीकडून पंडित/भटजी मृत व्यक्तीच्या धर्मानुसार पूजा करतील, ते विधी पार पाडण्यासाठी कुटुंबाला मार्गदर्शन आणि मदत करतील. ही कंपनी या पॅकेजमध्ये वाढदिवसापासून अंत्यविधीपर्यंत अशी सगळी सुविधा देते. दिल्लीतील सुखांतच्या स्टॉलमुळे सोशल मीडियावर या कंपनीची जोरदार चर्चा होत आहे.
टॅग्स :businessव्यवसाय