- मयूर पठाडे विराट कोहलीच्या दाढीचे केस उपटायची हिंमत? आहे कोणात? विराटच्या साधं जवळ जायलाही जगभरातले बॉलर तर जाऊ द्या, पण त्यांनी टाकलेले बॉलही घाबरतात. कारण आपण टाकलेल्या बॉलचं काय होईल हे त्या बॉलर्सना आणि बॉललाही माहीत असतं. थोडासाही चुकारपणा केला तर हा माणूस आपल्याला उचलून पटकणार, सीमापार तडाखा देणार किंवा उचलून सरळ बॉऊण्ड्रीवरून बाहेर भिरकावून देणार, हे निश्चित.आणि विराटचा इतिहासही काही असा प्रेमळ नाही. कुणाचं चुकलं तर त्याला प्रेमानं काही सांगेल, आंजारुन, गोंजारून समजावून सांगेल. छे !कोणी अरे केलं तर हा कारे करणारच. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि त्याच्या टीमनं हा अनुभव आणि धडा घेतला.ही झाली खेळाची गोष्ट, पण पर्सनल बाबतीत ढवळाढवळ? थेट त्याच्या दाढीला हात घालण्याची हिंमत?.विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याबाबत जेव्हा सगळीकडून कंड्या पिकत होत्या, तेव्हाही विराट कोहलीनं सगळ्यांना ‘चूप बसा, माझ्या पर्सनल बाबतीत उगाच नाक खुपसू नका’ म्हणून चांगलंच खडसावलं होतं.पण त्याच्या दाढीला हात घालण्याची हिंमत?आणि तरीही काहीही करता विराट चक्क हसतोंय! त्याचा आनंदही घेतोय! आपली दाढी खेचणार्याचा फोटो स्वत:च शेअरही करतोय?.सोशल मिडियावर हा फोटो सध्या खूपच व्हायरल आहे.ऐसे कैसे हो सकता है?बिलकुल नामुमकिन.लेकिन ऐसा हुआ है.नामुमकिन को मुमकिन बनाना विराट की आदत जो है.पण कोण आहे ही व्यक्ती, जिनं विराटची दाढी खेचण्याची हिंमत केली?ती व्यक्तीही तशीच हिंमतवान असली पाहिजे.आहेच ती व्यक्ती हिंमतवान.कारण तिचाही इतिहास तसाच आहे.विराट तर तिच्यासाठी ‘बच्चा’ आहे, कारण याआधी तिनं मास्टर ब्लास्टर सचिनचे गाल खेचले आहेत, युवराजला डिवचलं आहे. त्याचं नाक ओढलं आहे. शिखर धवनच्या पोटावर बसून त्याला गुद्दे मारले आहेत. ही हिंमतवान व्यक्ती आहे हिनाया!.हरभजन सिंगची नऊ महिन्यांची मुलगी!हरभजन आणि गीता बसरा यांना गेल्या वर्षी जुलैमध्यें लंडनमध्ये मुलगी झाली. तिच ही हिनाया. अजून ती वर्षभराचीही झाली नाही तरी तिची ही हिंमत.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे!हरभजन मैदानावर कितीही संतापी असला तरी जवळपास सगळ्याच क्रिकेटपटूंशी त्याचा याराना आहे. सध्या आयपीएलचा दहावा हंगाम सुरू आहे. त्यात हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळतो आहे. हे सामने पाहण्यासाठी अर्थातच क्रिकेटपटूंचे कुटुंबियही हजर असतात. मैदानावरचे सामने कितीही अटीतटीचे होत असले तरी क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या कुटुंबियांतील संवाद आणि भेटी ही त्यातली आनंदाची झुळुक.आनंदाची ही लहर फुलवण्याचं काम सध्या हिनाया करते आहे.