ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - संजय लीला भंन्साळींचा आगामी सिनेमा पद्मावती सध्या चांगलाच चर्चेत आहे. राजस्थानमध्ये सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भन्साळींना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला. पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने त्याचा निषेध करत हल्ला केला. त्यामुळे ज्या पद्मावतीमुळे भन्साळींना मारहाण करण्यात आली ती राणी पद्मावती नेमकी कोण होती? आणि काय होती तिची कथा? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. जाणून घेऊया कोण होती राणी पद्मावती-राणी पद्मावती चित्तोडची स्वाभिमानी राणी होती. सौंदर्याची खाण असलेल्या पद्मावतीच्याच्या शौर्याची आणि बलिदानाची कथा इतिहासात अमर आहे.… सिंहल द्वीपचे राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावतीची मुलगी पद्मावतीचं लग्न चित्तोड़चे राजा रतनसिंह यांच्यासोबत झालं. राणी पद्मावती दिसण्यास अत्यंत सुंदर आणि मनमोहक होती त्यामुळेच एक दिवस दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीची वाईट नजर तिच्यावर पडली. राणी पद्मावतीला मिळवण्यासाठी खिलजीने चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला. पण त्याने किल्ल्याला वेढा दिला होता. त्यानंतर त्याने वेगळी चाल खेळत आपण किल्ल्याचा वेढा काढू पण एकदा केवळ पद्मावतीचे मुखदर्शन व्हावे असा खलिता पाठविला. यावर रतनसिंह यांनी सहमती दर्शवली. मात्र, एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अट तिने घातली. त्यानंतर पद्मावतीचं निखळ सौदर्य पाहून खिलजी घायाळ झाला. दगा-फटका करत त्याने राजा रतन सिंहला कैद केलं आणि जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकी दिली.त्यावर पद्मावतीनेही चाल खेळली आणि शरण येण्याची तयारी दाखवली पण एक अट ठेवली. ती म्हणजे 700 दासी सोबत घेऊन येण्याची अट . खिलजी तयार झाला.दुस-या दिवशी पालख्या येताना पाहून खिलजी खूष झाला. यापैकी एका पालखीत पद्मावती असणार असं त्याला वाटलं. पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली होती, योग्य वेळ साधत सैनिकांनी खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.हा अपमान खिलजीला सहन झाला नाही. तो चवताळला आणि घमासान युद्धाला सुरूवात झाली. या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले आणि सोबतच राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. युद्धात हार झाल्याचं ऐकून राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आतमध्ये एक मोठी चिता जाळण्यास सांगितलं. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिने चितेत उडीत घेण्याचा निर्णय़ घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिलजीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह जवळपास 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.